गोवा (दिनांक २५ जानेवारी) – इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) बुधवारी दक्षिणेतील दोन क्लब एकमेकांना भिडणार आहेत. चेन्नईयन एफसीनं सातत्यपूर्ण कामगिरी करून अव्वल चौघांत स्थान पटकावले आहे आणि बंगलोर एफसीवर विजय मिळवून त्यांचे अव्वल स्थानावर झेप घेण्याचा निर्धार आहे.
चेन्नईयन संघ सध्या १२ सामन्यांनंतर १८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि प्रजासत्ताक दिनी विजय मिळवल्यास ते जमशेदपूर एफसी, केरला ब्लास्टर्स एफसी आणि हैदराबाद एफसी यांना मागे टाकून थेट अव्वल स्थानावर विराजमान होतील. पण, बोझिदार बँडोव्हीच यांच्या चेन्नईयन संघासाठी हा मार्ग दिसतोय तेवढा सोपा नक्की नाही. बंगलोर एफसीनं मागील सामन्यांत ४-२ अशा फरकानं चेन्नईयनला पराभूत केले आहे.
बंगलोरच्या संघाला आठवडाभर सराव करता आला नव्हता, परंतु एफसी गोवाविरुद्धच्या लढतीत सुनील छेत्रीच्या गोलनं बंगलोरला ०-१ अशा पिछाडीवरून १-१ अशी बरोबरी मिळवून दिली होती. बंगलोरचा संघ १४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी विजय मिळवल्यात ते अव्वल चार संघांच्या आणखी जवळ पोहोचतील. मुख्य प्रशिक्षक मार्को पेझाइयूओली यांना छेत्रीनं गोलदुष्काळ संपवल्याचा आनंद आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या छेत्रीला बाकावर बसवण्यात आले होते, परंतु मागील सामन्यात त्यानं दमदार पुनरागमन केलं.
मार्को यांना दुखापतग्रस्त खेळाडूंच्या वाढत्या यादीनं चिंतीत केलं आहे. ”खेळाडूंच्या दुखापतीनं चिंता वाढवली आहे. आशिक कुरूनियन हा दुखापतग्रस्त आहे, क्लेईटन सिल्व्हाच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे आणि य्रोंडू मुसाव्हू-किंग याच्याबाबतची खात्री नाही,”असे मार्को यांनी सांगितले.
चेन्नईयनचा विचार केल्यास व्लॅदिमिर कोमान याचे पुनरागमन संघाला फायद्याचे ठरले आहे आणि मागच्या सामन्यात त्याने गोलही केलाय. प्रशिक्षक बँडोव्हीच यांनी या लढतीत लालिआंझुआला छांग्टे खेळणार नाही हे स्पष्ट केले. ते म्हणाले, तांत्रिक रणनीतीच्या कारणास्तव मी छांग्टेला खेळवणार नाही. त्याचा करारही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि आता पुढील निर्णय हा त्याच्या हाती आहे.”