गोवा (दिनांक ४ जानेवारी) – तुलनेनं दुबळ्या एससी ईस्ट बंगालनं इंडियन सुपर लीग ( आयएसएल)मध्ये आज बंगलोर एफसीला कडवी झुंज दिली. एका चूकीनं ऐतिहासिक ईस्ट बंगालनं विजयाची संधी गमावली. २८व्या मिनिटाला थाँगखोसिएम सेम्बोईनं ईस्ट बंगालसाठी पहिला गोल केला, परंतु दुसऱ्या हाफमध्ये सौरव दास ( ५५ मि. ) याच्या स्वयंगोलनं बंगलोर एफसीला बरोबरी मिळवून दिली. या आयत्या गोलनंतरही बंगलोरला विजयी गोल करण्यापासून ईस्ट बंगालनं रोखले. ईस्ट बंगालच्या हाती विजय आला नसला तरी त्यांचा खेळ कमालीचा उंचावलेला दिसला.
जेतेपदाच्या शर्यतीतून जवळपास बाहेरच झालेल्या एससी ईस्ट बंगाल संघाविरुद्ध बंगलोर एफसीचे पारडे जड असेल, हे कुणीही डोळे मिटून सांगितले असते. पण, पहिल्या हाफमध्ये जो खेळ ईस्ट बंगालनं दाखवला ते पाहून साऱ्यांचेच डोळे थाडकन उघडले असतील. अतिबचावात्मक खेळ बंगलोर एफसीसाठी घातक ठरला. नववर्षात ईस्ट बंगालनं सर्वांना आश्चर्यचकित करणारा खेळ केला. ईस्ट बंगालनं सुरुवातीपासूनच गोल करण्याचे चान्स तयार केले. १०व्या मिनिटाला ते खाते उघडण्याच्या जवळपास पोहोचलेच होते. पण, एससी ईस्ट बंगाल संघानं २८व्या मिनिटाला बंगलोर एफसीची बचावफळी भेदली. वाहेंगबाम लुवांगच्या क्रॉसवर थाँगशोसिएम सेम्बोईनं लोव्हर हेडरद्वारे गोल केला. पहिल्या हाफमध्ये बंगलोरनं ६५% चेंडूवर ताबा राखला होता, पण त्यांच्याकडून १ शॉट ऑन टार्गेट राखता आला नाही. त्यांनी केलेले तीन प्रयत्न ऑफ टार्गेट ठरले. उलट ईस्ट बंगालनं एकच ऑन टार्गेट शॉट घेतला आणि तोही यशस्वी ठरवला. ४६व्या मिनिटाला बंगलोर बरोबरीचा गोल करण्यानजीक पोहोचले होते आणि प्रथमच ते चेंडू पेनल्टी बॉक्सपर्यंत घेऊन गेले होते.
दुसऱ्या हाफमध्ये बंगलोरचा संघ दडपणाखाली खेळताना दिसला. त्यातही ४८व्या मिनिटाला बंगलोरचा गोल करण्याचा प्रयत्न ईस्ट बंगालचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य यानं हाणून पाडला. बंगलोरकडून सातत्यानं चुका होताना दिसत होत्या. ईस्ट बंगालनं आक्रमणासोबतच बचावातही कमालीचा खेळ केला. बंगलोरच्या आक्रमणाची धार त्यामुळेच बोथट झालेली दिसली. ईस्ट बंगालच्या आदील खानचा बचाब अप्रतिम ठरला. ५५व्या मिनिटाला बंगलोरच्या खेळाडूनं उजव्या बाजूनं मारलेला चेंडूला दिशा देण्याच्या प्रयत्नात ईस्ट बंगालच्या सौरव दासकडून हेडरद्वारे स्वयंगोल झाला. भट्टाचार्यला तो अडवता न आल्यानं बंगलोरला १-१ अशी बरोबरी मिळवता आली. या गोलमुळे बंगलोरला मानसिक आधार दिला अन् त्यांचा खेळाडूंचा उत्साह वाढला. ७२व्या मिनिटाला सुनील छेत्रीचा प्रयत्न ईस्ट बंगालच्या हिरा मोंडलनं अपयशी ठरवला. पेनल्टी बॉक्सवरून सुनीलनं हा चेंडू गोलजाळीच्या दिशेनं भिरकावला, परंतु हिरानं रेषेनजीकच तो मागे परतवून लावला.
अखेरच्या १० मिनिटांत दोन्ही संघ आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात दिसले. ८१ व्या मिनिटाला सेम्बोईसाठी सोपी संधी चालून आली होती, त्यानं चेंडूवर ताबा राखून संयम दाखवला असता तर कदाचित ईस्ट बंगालसाठी आघाडीचा गोल करू शकला असता. पाच मिनिटांच्या भरपाईवेळेतही दोन्ही संघांना आघाडीचा गोल करता आला नाही आणि सामना १-१ असा बरोबरीतच सुटला.
निकाल – एससी ईस्ट बंगाल १ ( थाँगखोसिएम सेम्बोई २८ मि. ) बरोबरी विरूद्ध बंगलोर एफसी १ ( सौरव दास ५५ मि. स्वयंगोल )