गोवा (दि १३ जानेवारी): इंडियन सुपर लीगमधील( आयएसएल) रंगतदार लढतीमध्ये चेन्नईयन एफसीचे हैदराबादला १-१ असे बरोबरीत रोखले. या ‘ड्रॉ’नंतर हैदराबादने ११ सामन्यांतून १७ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
फातोर्डातील पीजीएन स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. ३-५-२ अशा फॉर्मेशनने खेळणाऱ्या चेन्नईयनने चौथ्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नरवर मिळवला. निंथॉइंगगँबा मीतलने चेंडूवर ताबा घेत पेनल्टी क्षेत्रात धडक मारली. मात्र, प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूने त्याला ब्लॉक केले. परंतु, चेंडू नीट क्लियर न केल्याने चेन्नईयनला कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. दुसरीकडे, ४-२-३-१ अशा फॉर्मेशनसह खेळणाऱ्या हैदराबादनेही आक्रमणावर भर दिला. दहाव्या मिनिटाला जॅवियर सिव्हेरिओने सुरेख प्रयत्न केला. मात्र, चेन्नईयनचा गोलकीपर देबजीत मजुमदारने चांगल्या पद्धतीने सेव्ह केला.
उभय संघाच्या प्रभावी आक्रमणामध्ये पहिला गोल करण्याचा मान चेन्नईयन एफसीने मिळवला. त्याचे क्रेडिट मोहम्मद साजित धोतला जाते. त्याने अनिरुद्ध थापाच्या सुरेख पासवर प्रतिस्पर्धी गोलकीपर लक्ष्मीकांत कट्टिमनीला चकवत १३व्या मिनिटाला चेन्नईयनला आघाडीवर नेले. उर्वरित कालावधीत उभय संघांनी काही सुरेख चाली रचल्या. मात्र, चेन्नईयनच्या बचाव फळीने प्रतिस्पर्ध्यांना थोपवले. चेन्नईयन आघाडी कायम राखणार, असे वाटत असताना मध्यंतरापूर्वीच्या अतिरिक्त वेळेत जॅवियर सिव्हेरिओने हैदराबादला १-१ अशी बरोबरी साधून दिली. आशीष रायच्या पासवर त्याने चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील होते. ५१व्या मिनिटाला हैदराबादच्या निखिल पुजारीने डाव्या कॉर्नरवरून मारलेला चेंडू बारवरून गेला. तीन मिनिटांनी निखिलने पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, चेन्नईयनचा बचाव सरस ठरला. त्यानंतर उभय संघांनी खेळाडूंची अदलाबदली केली. मात्र, गोल बरोबरी कायम राहिली. हैदराबादची ११ सामन्यांतील ही पाचवी बरोबरी आहे. त्यांचे ११ सामन्यांतून १७ गुण झालेत. एका गुणासह पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबाद संघ तिसऱ्या स्थानी सरकला. दुसरीकडे, चेन्नईयनला ११ सामन्यांत तिसऱ्यांदा बरोबरी पाहावी लागली. १५ गुणांसह ते सहाव्या स्थानी कायम आहेत.
संपूर्ण लढतीत उभय संघांनी समसमान वर्चस्व राखले. पेनल्टी कॉर्नरसह (९-७) चेंडूचा ताबा (५८-४२ टक्के) मिळवण्यात दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नव्हता. हैदराबादने ३८३ पासेस दिले. तुलनेत चेन्नईयनने ३०० पासेस दिले. टार्गेटवर शॉट मारण्यात (१०-४) हैदराबादने प्रतिस्पर्ध्यांवर थोडी आघाडी घेतली.
निकाल : चेन्नईयन एफसी-१(मोहम्मद साजित धोत, १३व्या मिनिटाला) बरोबरी वि. हैदराबाद एफसी-१(जॅवियर सिव्हेरिओ, ४५+४व्या मिनिटाला).