गुवाहाटी: मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाहेरील मैदानावरील सामन्यात (अवे मॅच) चौथ्या मोसमात पहिलावहिला विजय मिळविला. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध बलवंत सिंगच्या दोन गोलांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडीयमवर बलवंतने दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी एक गोल केला.
बलवंतचे यंदाच्या लिगमधील एकूण गोल चार झाले. तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलच्या शर्यतीत आघाडीवर आला. जेजे लालपेखलुआ (चेन्नईयीन एफसी) आणि सुनील छेत्री (बेंगळुरु एफसी) यांचे प्रत्येकी तीन गोल आहेत.
मुंबईने सात सामन्यांत तिसरा विजय मिळविला. आधीचे दोन विजय त्यांनी घरच्या मैदानावर मिळविले होते. मुंबईचे एकूण दहा गुण झाले. एफसी पुणे सिटीला मागे टाकून मुंबईने गुणतक्त्यात चौथे स्थान गाठले. पुण्याचे सहा सामन्यांत नऊ गुण आहेत. नॉर्थईस्ट सहा सामन्यांतून चार गुणांसह नवव्या स्थानावर कायम राहिले.
नॉर्थईस्टने सरस प्रयत्न केले, पण त्यांना फिनिशिंग करता आले नाही. दुसरीकडे मुंबईने मुंबईने संधीचा फायदा उठविला. यात पूर्वार्धात काही वेळा संधी दवडल्यानंतर बलवंतने संघाची निराशा केली नाही.
34व्या मिनिटाला अचीले एमाना याने बलवंतला सुंदर पास दिला. बलवंत घोडदौड करीत असतानाच नॉर्थईस्टचा गोलरक्षक रवी कुमार त्याची जागा सोडून पुढे धावत आला. वास्तवित त्यावेळी त्याचे सहकारी बलवंतला रोखू शकत होते, पण रवी पुढे आला त्याने घसरत बलवंतला रोखण्याचा प्रयत्न केला. बलवंतने संधी साधत चेंडू मारला. हा चेंडू रवीच्या पायांमधून नेटमध्ये गेला. टी. पी. रेहेनेश निलंबीत असल्यामुळे रवीला संधी मिळाली होती, पण त्याची चूक संघाला भोवली.
बलवंतने दुसऱ्याच मिनिटाला ऑफसाईडचा सापळा भेदण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र नॉर्थईस्टने उल्लेखनीय प्रयत्न केले. तिसऱ्या मिनिटाला मार्सिनीयोने मुंबईच्या दोघांना हुलकावणी देत आगेकूच केली होती, पण त्याने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. हे नॉर्थईस्टचे निव्वळ दुर्दैव ठरले. नवव्या मिनिटाला बलवंतच्या क्रॉस पासवर थियागो सँटोस चेंडूपर्यंत पोचताना टायमिंग साधू शकला नाही.
सतराव्या मिनिटाला बलवंतने स्वतःच प्रयत्न केला, पण रवीने चेंडू आरामात अडविला. पुढच्याच मिनिटाला नॉर्थईस्टच्या हालीचरण नर्झारीने चेंडूवरील ताबा गमावला, पण ही संधी सुद्धा बलवंतला साधता आली नाही. 21व्या मिनिटाला बलवंतच्या पासवर संजू प्रधानला संधी मिळाली होती, पण नॉर्थईस्टने कडेकोट बचाव केला.
26व्या मिनिटाला नर्झारीच्या क्रॉसपासवर मार्सिनीयो नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यानंतर चेंडू सैमीनलेन डुंगेलपाशी गेला. डुंगेलला चांगली संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू नेटवरून गेला. 30व्या मिनिटाला मार्सिनीयो आणि मार्टिन डियाझ यांनी आगेकूच केली. डियाझचा पास अचूक नसूनही नर्झारीने कसोशीने प्रयत्ने केले, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने चेंडू अडविला.
मुंबईने मध्यंतरास एका गोलची आघाडी टिकविली. दुसऱ्या सत्रात सुरवात वेगवान झाली. 48व्या मिनिटाला नर्झारी आणि गेर्सन व्हिएरा यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यावेळी व्हिएराने नर्झारीला किक मारण्याचा प्रयत्न केला. 50व्या मिनिटाला नर्झारीच्या क्रॉसपासवर डॅनिलो लोपेसने प्रयत्न केले, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला.
68व्या मिनिटाला रोलीन बोर्जेसने दडपणाखाली चेंडू गमावला. त्याचा बॅकपास चुकला. त्यामुळे अचीले एमाना याला संधी मिळाली. त्याने चेंडूवर ताबा मिळवित घोडदौड केली आणि बलवंतला पास दिला. बलवंतने संधीचे सोने करीत वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल केला. हा त्याचा यंदाच्या लिगमधील एकूण चौथा गोल ठरला.
घरच्या मैदानावर नॉर्थईस्टने दुसऱ्या सत्रातही मार्सियानो, नर्झारी यांनी कसून प्रयत्न केेले, पण अमरिंदरचा बचाव त्यांना भेदता आला नाही.