हैदराबाद एफसीने अखेर हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मध्ये जमशेदपूर एफसी विरुद्ध विजयाची नोंद केली. हिरो आयएसएलमधील हैदराबादचा हा जमशेदपूरवरील पहिला विजय ठरला. यापूर्वी आयएसएलमध्ये दोन्ही संघ सहा वेळा एकमेकांना भिडले होते आणि त्यातील चार सामने अनिर्णित राहिले होते. जमशेदपूरच्या खात्यात दोन विजय होते. पण, आज गतविजेत्या हैदराबादने मोहम्मद यासीरच्या (४८ मि. ) गोलच्या जोरावर विजय मिळवला. पहिल्या हाफमध्ये जमशेदपूरकडून जोशपूर्ण खेळ झाला, परंतु मध्यंतरानंतर ते ढेपाळले. हैदराबाद एफसीचा हा या पर्वातील सलग पाचवा विजय ठरला आणि पाचही सामन्यांत त्यांनी क्लीन शीट राखली.
हैदराबादचा बार्थोलोमेव ऑग्बेचे आणि जमशेदपूरचा डॅनिएक चुक्वू यांच्यातील टशन पाहण्यासाठी सर्व उत्सुक होते. दुसऱ्या मिनिटाला जमशेदपूरच्या बॉरिस सिंगने ऑन टार्गेट प्रयत्न केला. पुढच्याच मिनिटाला चूक्वूना सुरेख संधी मिळाली, परंतु त्याचा प्रयत्न ऑफ टार्गेट राहिला. जमशेदपूरचे खेळाडू सातत्याने हैदराबादच्या पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण सुरू ठेवले. २०व्या मिनिटाला चूक्वूने गोलजाळीच्या एकदम जवळून हेडरद्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेने पाठवला अन् जल्लोष करत सुटला. मात्र, हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने सुरेखरित्या तो अडवला अन् चेंडू रेषेच्या पार जाऊ दिला नाही. त्यामुळे जमशेदपूरचा हा गोल थोडक्यात हुकला.
२७व्या मिनिटाला हॅरी सॉयरने १८ यार्ड बॉक्समध्ये गोल करण्याच्या प्रयत्नात हैदराबादच्या गोलरक्षकाला धडक दिली. कट्टीमणी बराच काल मैदानावर आडवा पडून होता. जमशेदपूरचा आक्रमण आणि हैदराबादचा बचाव असाच खेळ सुरू होता. हैदराबादकडून संधी मिळेल, तसा गोल करण्याचा प्रयत्न होताना दिसला. सॉयरसोबत झालेली टक्कर कट्टीमणाली दुखापतीमुळे माघारी जाण्यास कारणीभूत ठरली. कट्टीमणीच्या जागी अनुज कुमार गोलरक्षक म्हणून मैदानावर आला. कट्टीमणीचे बाहेर जाणे हे हैदराबादची बचावफळी कमकुवत करण्यासारखे होते. एकंदर पहिल्या हाफमध्ये जमशेदपूरचेच वर्चस्व राहिले, फक्त त्यांना सातत्याने प्रयत्न करूनही गोल करता आला नाही. ऑग्बेचे व झेव्हियर सिव्हेरीयो या हैदराबादच्या आक्रमणपटूंची ४५ मिनिटांच्या खेळात उपस्थिती जाणवलीच नाही.
https://twitter.com/HydFCOfficial/status/1590374503636340736?s=20&t=XplFszeuBM27ZBQgnfkX2g
दुसऱ्या हाफमध्ये हैदराबादने फॉरमेशनमध्ये बदल केला आणि ४८ व्या मिनिटाला मोहम्मद यासीरने हैदराबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ५१व्या मिनिटाला बोर्या हेरेराच्या क्रॉसवर ६ यार्ड बॉक्समध्ये उभ्या असलेल्या ऑग्बेचेला गोल करण्याची संधी होती, परंतु जितेंद्र सिंगने सुरेख बचाव केला. मध्यंतरानंतर हैदराबादचा खेळ वरचढ होताना दिसला आणि यावेळेस जमशेदपूरला गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. ६३व्या मिनिटाला हलिचरण नर्झरी, जाओ व्हिक्टर आणि ऑग्बेचे यांनी जमशेदपूरच्या पेनल्टी क्षेत्रात तणाव निर्माण केले होते. हैदराबादने त्यांची आघाडी जवळपास दुप्पट केलीच होती, पण जमशेदपूरचा गोलरक्षक रेहेनेश टीपीने योग्यवेळी चेंडूवर ताबा मिळवला.
७३व्या मिनिटाला बॉरिसने सुरेख पास करताना पीटर हार्टलीसाठी गोल करण्याची संधी निर्माण केली. हार्टलीने ऑन टार्गेट प्रयत्न मारला, परंतु गोलरक्षकाने तो सहज अडवला. ही संधी सोडल्यास ८० मिनिंटाच्या खेळात जमशेदपूरकडून फार काही प्रयत्न झालेला दिसला नाही, मुळात हैदराबादने तशी त्यांना संधीच दिली नाही. ८२व्या मिनिटाला ऑग्बेचेचा हेडरद्वारे ऑन टार्गेट झालेला प्रयत्न जमशेदपूरच्या गोलरक्षकाने रोखला. ८५व्या मिनिटाला गोलरक्षकाच्या चुकीमुळे जमशेदपूरला १८ यार्ड बॉक्सवरून फ्री किक मिळाली, परंतु ही संधीपण त्यांनी गमावली.
https://twitter.com/IndSuperLeague/status/1590386655965614082?s=20&t=XplFszeuBM27ZBQgnfkX2g
जमशेदपूरकडून बॉरिसच्या खेळाचे कौतुक करायला हवं. त्याने कडवी झुंज दिली. ९०+३ मिनिटाला बॉरिस बरोबरीचा गोल करण्यासाठी पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, परंतु ओडेई ओनाईंडियाने त्याला रोखले. पुढच्याच मिनिटाला इशान पंडिताला आयती संधी मिळाली, परंतु त्याने घाई केली आणि जमशेदपूरची पाटी कोरीच राहिली. ISL Hyderabad FC’s fifth win in a row, defeats Jamshedpur FC for the first time
निकाल : हैदराबाद एफसी १ ( मोहम्मद यासीर ४८ मि. ) विजयी वि. जमशेदपूर एफसी ०
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी20 क्रिकेट अर्थहीन’; माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे अजब वक्तव्य
दक्षिण आफ्रिका नाही तर ‘हा’ संघ आहे चोकर्स, तब्बल 12 वेळा सेमीफायनलमध्ये जाऊनही झोळी रिकामीच