गोवा (दिनांक ९ जानेवारी)- केरला ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात हैदराबाद एफसीला कडवी टक्कर दिली. पहिल्या हाफमध्ये अल्व्हारो व्हॅझकेज ( ४२ मि.) ने केलेल्या गोलच्या जोरावर घेतलेली आघाडी केरला ब्लास्टर्सने शेवटपर्यंत कायम राखली. केरला ब्लास्टर्सने मागील ८ सामन्यांतील अपराजित मालिका कायम राखताना चौथ्या विजयाची नोंद केली. या निकालामुळे केरला ब्लास्टर्सनं १७ गुणांसह थेट अव्वल स्थान गाठले, तर हैदराबाद एफसीची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. हैदराबाद एफसीच्या बार्थोलोमेव ऑग्बेचेला आजच्या सामन्यातही पिवळे कार्ड मिळाले आणि हे त्याचे चौथे पिवळे कार्ड असल्यानं त्याला पुढील सामन्याला मुकावे लागणार आहे.
२४व्या मिनिटाला जॉर्ज डाएजनं गोलपोस्टजवळून हेडरद्वारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न हैदराबाद एफसीचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याने सुरेखरित्या अडवला. २६व्या मिनिटाला क्रॉसवर एडू गार्सियाला हेडरद्वारे गोल करण्याची संधी होती, परंतु केरला ब्लास्टर्सच्या बचावपटूनं त्याला ब्लॉक केले. दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरूच होते. पण, दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन शॉट ऑन टार्गेट प्रयत्न गोलरक्षकांनी अडवले.
हैदराबादचा गोलरक्षक कट्टीमणीच्या खेळाचा दर्जा आज काही औरच दिसला, परंतु ४२व्या मिनिटाला त्यालाही हार मानावी लागली. ४२व्या मिनिटाला थ्रो बॉलवरून आलेला चेंडू हैदराबादच्या बचावपटूंनी दूर टोलावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पेनल्टी बॉक्सवर उभ्या असलेल्या अल्व्हारो व्हॅझकेजकडे गेला आणि त्यानं लेफ्ट फूटनं सुरेख वॉली मारून गोलजाळीत पाठवला. कट्टीमणीला तो रोखण्यासाठी वेळच मिळाला नाही, इतक्या वेगानं तो गोल झाला. केरला ब्लास्टर्सनं १-० अशी आघाडी घेतली. भरपाईवेळेतील तिसऱ्या मिनिटाला हैदराबादनं बरोबरी करण्याची संधी गमावली. चिंगलेनसाना आणि ओग्बेचे यांच्यातला ताळमेळ चुकला अन् हैदराबादनं संधी गमावली. पहिल्या हाफमध्ये केरलानं १-० अशी आघाडी कायम राखली.
मध्यंतरानंतर हैदराबाद एफसीचा खेळ उंचावेल असे वाटले होते, परंतु पहिल्या दहा मिनिटांत केरलाचेच खेळाडू भारी पडले. ५३व्या मिनिटाला अनिकेत जाधवने हैदराबादला बरोबरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ५७व्या मिनिटाला अल्व्हारोकडून लाँग रेंजवरून गोलसाठी शॉर्ट घेण्याचा प्रयत्न झाला. ६०व्या मिनिटाला संदीप सिंगनं बॉक्स बाहेर अनिकेतला पाडले अन् हैदराबादला फ्री किक मिळाली. बार्थोलोमेव ऑग्बेचेचा हा प्रयत्न फसला. पण, यानंतर हैदराबाद एफसीचा खेळ उंचावत जात असल्याचे दिसले. अनिकेत केरलाच्या खेळाडूंना चांगलाच चकवत होता. पण, केरलाचे खेळाडू हैदराबादला बरोबरीचा गोल काही केल्या करू देत नव्हते. ८३ व्या मिनिटाला एड्रीयन लुना केरलाची आघाडी २-० अशी करण्याच्या नजीक पोहोचला होता, परंतु हैदराबादच्या बचावपटूंनी त्याला रोखले. केरला ब्लास्टर्सने हा सामना १-० असा जिंकला.
निकाल – केरला ब्लास्टर्स १ ( अल्व्हारो व्हॅझकेज ४२ मि. ) विजयी विरूद्ध हैदराबाद एफसी ०.