केरळमधील फुटबॉलप्रेमाच्या इतिहासाची परंपरा कित्येक शतकांची आहे. यासंदर्भात वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा कमालीचा लोकप्रिय सेव्हन्स हा प्रकार, जेव्हा येथील मैदानावर किक मारली जाते तेव्हा फुटबॉलप्रेमाची प्रचिती येते.
ब्रिटीश राजवटीत इंग्रज सैनिक आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांमुळे जगातील या भागात फुटबॉल लोकप्रिय ठरला आहे. हे प्रमाण देशाला झपाटून टाकणाऱ्या क्रिकेटपेक्षा जास्त ठरले आहे. या खेळात या राज्याने किताब जिंकले आहेत. येथील क्लबनी नावलौकीक कमावला आहे. फुटबॉलपटूंची नावे येथील घराघरांत पोहोचली आहेत. 2014 मध्ये केरला ब्लास्टर्स एफसीचा उदय होईपर्यंत मात्र येथील फुटबॉल काहीसा ठप्प झाला होता. दरम्यानच्या कालावधीत अनेक क्लब आकारास आले, पण कुणीच स्थिरावू शकले नाही.
प्रारंभ केल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीत ब्लास्टर्सने उत्तरोत्तर भक्कम वाटचाल केली आहे. सर्वदूर लक्षणीय पाठींबा मिळणारा आशिया खंडातील एक क्लब असा लौकीक ब्लास्टर्सने निर्माण केला आहे. फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर प्रत्येकी दहा लाखाहून जास्त चाहते त्यांना लाभले आहेत. ऑनलाईन चाहत्यांची ही फौज अनेक प्रमुख फुटबॉल क्लबशी चुरस करू शकते. जगामध्ये डीजीटल व्यासपीठावर सर्वाधिक प्रतिसाद मिळणाऱ्या पहिल्या शंभर क्लबमध्ये दक्षिण आशियात केवळ ब्लास्टर्सला स्थान आहे.
ब्लास्टर्सचे एकूण डिजीटल चाहते सुमारे 43 लाख आहेत, जे प्रमाण लॉस एंजलिस गॅलॅक्सी (41 लाख), सेल्टीक एफसी (31 लाख) आणि जपानचा एएफसी चँपीयन्स लीग विजेता काशीमा अँटलर्स (5 लाख) अशा प्रसिद्ध क्लबपेक्षा जास्त आहे.
केरळवासी कोचीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपल्या संघाला देणाऱ्या भरघोस पाठिंब्याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. पहिल्या दोन वर्षांत येथील स्टेडियमची क्षमता 60 हजार प्रेक्षकांची होती. त्यानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांमुळे 2017 मध्ये ती 40 हजारापर्यंत आली. यानंतरही ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर मिळणारा पाठिंबा हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) प्रतिस्पर्धी संघांना हेवा वाटणारा आहे.
एल्को शात्तोरी यांनी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीकडून येथे येण्याचा निर्णय घेतला आणि ते ब्लास्टर्सचे मार्गदर्शक बनले. तेव्हा ते म्हणाले होते की, चाहत्यांच्या रुपाने संघाला अतिरीक्त खेळाडू मिळतो, जो इतर संघांना कोचीमध्ये येऊन खेळणे अवघड ठरवितो.
अशा या लोकप्रिय क्लबकडे उणीव आहे ती आयएसएल ट्रॉफीची. दोन वेळा ते अगदी नजिक आले होते, पण 2014 आणि 2016 अशा दोन मोसमांत त्यांना अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. दोन्ही वेळा एटीकेविरुद्ध ते हरले. गेल्या दोन मोसमांत त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे. अलीकडचे निकाल निराशाजनक असले तरी शात्तोरी यांची मुख्य मार्गदर्शकपदी झालेली नियुक्ती आणि संघात अनेक प्रभावी खेळाडू भरती केल्यामुळे क्लबच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ब्लास्टर्सच्या सुकाणू समितीचे सदस्य सोमू जोसेफ यांनी सांगितले की, आयएसएलमुळे भारतात नवी फुटबॉल क्रांती होत आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे चाहत्यांची संघाशी नाळ जुळते. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सामन्यांतही हे दिसून येते. बाहेरच्या शहरांत राहणारे केरळवासी तसेच संघाला प्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रेक्षकांमुळे सामन्यासाठी उपस्थिती मोठी असते. हे क्लबचे वैशिष्ट्य ठरते.
ब्लास्टर्स सामन्याच्या दिवशी असंख्य उपक्रम राबविते. याशिवाय वेगवेगळे सामाजिक उपक्रमही आखले जातात. त्यामुळे सामना घरच्या मैदानावर असो किंवा बाहेरच्या, चाहत्यांचा सर्वाधिक वादळी पाठिंबा मिळणारा संघ ब्लास्टर्स असतो.
स्टेडियममध्ये चाहत्यांची उपस्थिती जाणवल्याशिवाय राहात नाही. घरच्या किंवा बाहेरच्या मैदानावरील पाठिंबा अतुलनीय आणि अथक असतो. त्यामुळे हा क्लब आगळावेगळा ठरतो. सहाव्या मोसमाच्या पूर्वतयारीसाठी ब्लास्टर्सने संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. त्यावेळी सुद्धा आखामधील केरळी बांधवांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. त्यांनी ब्लास्टर्सच्या पिवळ्या जर्सी घातल्या होत्या. त्यामुळे आता प्रसिद्ध झालेला पिवळा सागर निर्माण झाला होता.
जगभरातील मल्याळी बांधव अभिमानाने ज्या क्लबला आपला स्वतःचा मानतात असे मानाचे स्थान ब्लास्टर्सने कमावले आहे.








3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर