क्रिकेटला धर्म समजला जाणाऱ्या आपल्या भारतात हळूहळू सर्वच खेळ आपले वेगळे आणि ठळक अस्तित्व निर्माण करु लागले आहेत. त्यात कबड्डी, टेनिस आणि इतर अनेक खेळ समाविष्ट आहेत आणि आता ज्या खेळाची चर्चा सर्वदूर आहे तो म्हणजे फुटबॉल.
जगात सर्वाधिक लोकप्रिय असणारा खेळ कोणता असा प्रश्न कोणी विचारला तर सहज फुटबाॅल असे उत्तर ऐकायला मिळते. तोच खेळ भारतात हल्ली प्रसिद्ध होतोय आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षी झालेला १७ वर्षाखालील फुटबाॅल विश्वचषक.
या विश्वचषकात प्रेक्षकांच्या उपस्थितीचे सर्व विक्रम मोडत भारताने १ नवीन विक्रम प्रस्थापित केला. आता या नंतर वेळ आहे ती इंडियन सुपर लीगच्या (ISL) चौथ्या मोसमाची.
परदेशात फुटबाॅल लीगचे वर्षभर सामने चालतात आणि ते आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात पाहिले जातात. त्याच आधारावर भारतात सुद्धा इंडियन सुपर लीगची २०१३ साली स्थापना झाली आणि २०१४ साली याचा पहिला मोसम खेळवला गेला.
पहिल्या मोसमाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढचे २ वर्ष प्रेक्षकांनी या लीगला डोक्यावर घेतले. पहिल्या ३ मोसमात ८ संघांनी यात भाग घेतला. तर या ४ थ्या वर्षी २ संघांने नव्याने लीग मध्ये प्रवेश केला आहे.
ही लीग प्रसिद्ध होण्यामागे अजून एक मुख्य कारण म्हणजे या लीगच्या संघाचे मालक. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, अभिषेक बच्चन, जाॅन अब्राहम, ह्रितिक रोशन, रणबीर कपूर या सर्व सेलेब्रिटिंचे संघ या लीग मध्ये आहेत त्यामुळे सुद्धा ही लीग एक चर्चेचा विषय ठरली आहे.
पहिले तीन मोसम ह्रितिक रोशन एफ सी पुणे सिटीचा सहमालक होता, मात्र या वर्षी अर्जुन कपूरने या संघात सहमालक म्हणून वाटा उचलला आहे.
लीगमध्ये या वर्षीच्या सर्व संघांची नावे खालील प्रमाणे:-
१. ॲटलेटिको डी कोलकाता
२. चेन्नईयान एफसी
३. एफसी गोवा
४. केरला ब्लास्टर्स
५. नाॅर्थइस्ट युनाइटेड
६. बॅंगलुरु एफसी
७. दिल्ली डायनॅमोझ
८. जमशेदपुर एफसी
९. मुंबई सिटी एफसी
१०. पुणे सिटी एफसी
या वर्षी बॅंगलुरु एफसी आणि जमशेदपुर एफसी या २ नवीन संघांचा समावेश झाला आहे. येत्या १७ नोव्हेंबर पासून ४ थ्या मोसमाचा शुभारंभ होणार आहे. या मोसमामध्ये ९० लीग सामने २ सेमी फायनलचे प्रत्येकी २-२ सामने आणि १ फायनल असे ९५ सामने खेळवले जातील.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)