वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे डब्लूडब्लूईने आपल्या अधिकृत वेबसाईट वरून भारतात लाईव्ह शो घेण्याची घोषणा केली आहे. हा शो ८ आणि ९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीच्या इंदीरा गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहेत. या खास शो साठी डब्लूडब्लूई सर्व मोठे सुपरस्टार भाग घेतील. या शोसाठीच्या तिकिटासंबंधीची कोणतीच घोषणा यात केली गेली नसून ती लवकरात लवकर करण्यात येईल.
या शोमध्ये सध्याचा डब्लूडब्लूई चॅम्पियन मॉडर्न डे महाराजा ‘जिंदर महाल’ आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. जिंदर महाल सोबत त्याचे दोन साथीदार सिंग ब्रदर्स हे देखील असतील. द बिग डॉग अर्थात रोमन रेन्स, सेथ रॉलेन्स, डीन अँब्रोस, ब्रॉन स्ट्रॉमन तर महिलांमध्ये अलेक्सा ब्लीस, साशा बॅंक्स हे अन्य मोठे सुपरस्टार या शोमध्ये सहभाग घेतील.
या शोबद्दल अधिकृत घोषणा झाल्यावर मूळचा भारतीय वंशाचा असणारा जिंदर महाल म्हणाला,”मी जेव्हा रिंगमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा माझा सन्मान असतो की भारताचे प्रतिनिधित्व करतो. आता त्यांच्या समोर लाईव्ह कौशल्य दाखवायचे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.”
सोनी नेटवर्क मधील स्पोर्ट्स आणि डिस्ट्रिब्युशन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कॉल म्हणाले की, “डब्लूडब्लूई नेहमीच भारतीय प्रेक्षांकानी त्यांच्याप्रती दाखवलेल्या प्रेमामुळे आनंदी असते. भारतात क्रिकेटनंतर सर्वात जास्त प्रेक्षक संख्या डब्लूडब्लूईला लाभते.”
दोन दिवसांपूर्वी डब्लूडब्लूईचे सीओओ ट्रिपल एच भारतात आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली की भारतात डब्लूडब्लूईचा लाईव्ह शो होईल. त्यानंतर ते मायदेशी परतले आणि आज डब्लूडब्लूईच्या संकेतस्थळावरून शोसाठीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
# डब्लूडब्लूईचा मागील शो जानेवारी २०१६ मध्ये झाला होता. हा शो भारतातील तीन मोठ्या शहरात झाला होता. ते म्हणजे मुंबई, दिल्ली, बेंगळुरू.
# २००२ नंतर झालेली ती पहिलीच डब्लूडब्लूई टुर होती आणि त्याला ‘रॉ टुर ऑफ इंडिया’ असे देखील संबोधले गेले होते.