भारताचा दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमार जेव्हा आपल्या खेळाच्या शीर्ष टप्प्यावर होता तेव्हा त्याने एकट्याने भारतीय कुस्तीला सोनेरी दिवस प्राप्त करून दिले होते. मात्र, पोलिस आता हत्येच्या प्रकरणात त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे खेळाची प्रतिमा डागाळली जात असल्याचे बोलले जातेय. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (डब्ल्यूएफआय) आता खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवत असल्याने चिंतेत पडला आहे.
तोमर यांनी दिली प्रतिक्रिया
डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सुशील कुमार बाबतच्या घटनेविषयी बोलताना म्हटले, “या घटनेमुळे भारतीय कुस्ती क्षेत्राची नाचक्की झाली आहे. या अप्रतिम खेळाबाबत लोकांची मने दूषित होऊ शकतात. खेळाडू आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात याच्याशी आमचा थेट संबंध नाही. आम्ही केवळ मैदानात त्यांनी कसे खेळावे याबाबत जबाबदार असतो. या खेळाला एक दर्जा प्राप्त करुन देण्यास आपल्याला खूप वर्ष लागली आहेत. पूर्वीपासून कुस्ती म्हणजे गुंडांचा खेळ असे म्हटले जायचे. हे आपण काहीअंशी मोडून काढले होते.”
काय आहे हे प्रकरण?
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या चकमकीत पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी सागर राणा नावाच्या कुस्तीपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एफआयआरमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याचे देखील नाव समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात सुशील कुमारचा या घटनेमध्ये सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुशील कुमारला पकडण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी केली असून, दिल्ली, हरियाणा व एन सी आर याठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे.
भारताचा सर्वात यशस्वी कुस्तीपटू आहे सुशील
सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देशाला ५६ वर्षांनंतर कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. २०१२ लंडन ऑलम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आपल्या नावे केलेले. सुशीलने सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्कार दिला गेला आहे. तसेच, भारतातील चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मश्री देखील त्याच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन