मुंबई । आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीनुसार इंग्लंडचा फलंदाज जॅक क्रॉली याने 53 फलंदाजांना मागे टाकत फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्ध साऊथॅम्प्टनविरुद्धच्या मंगळवारी संपलेल्या तिसर्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जॅक क्रॉलीने द्विशतक ठोकले होते. त्यामुळे इंग्लंडच्या या खेळाडूने 53 स्थानांची झेप घेत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 28 वे स्थान गाठले आहे. पाकिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यापूर्वी क्रॉली 95 व्या स्थानावर होता. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 320 धावा केल्या.
पाकिस्तान विरुद्ध तिसर्या कसोटी सामन्यात 152 धावा करणारा बटलरही 637 गुणांसह कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 21 व्या स्थानावर पोहोचला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीतील पहिल्या दहाजणांमधून बाहेर पडलेल्या अँडरसनने पुन्हा सहा स्थानांची झेप घेतली आहे. आता तो आठव्या स्थानावर आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 बळी घेतले होते. त्यामुळे त्याने 29 वेळा डावात पाच किंवा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला.
तसेच दुसर्या डावात त्याने 2 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार अजहर अलीला बाद केले तेव्हा त्याने त्याच्या कारकिर्दीतील 600 कसोटी बळी पूर्ण केले. तो 600 कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
🚨 James Anderson back in the top 10 🚨
After bagging his record 600th victim and 29th five-for in the third #ENGvPAK Test, Anderson has moved up six places in the @MRFWorldwide ICC Test Rankings for bowlers 🔥 pic.twitter.com/b58ydPYf0N
— ICC (@ICC) August 26, 2020
पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने न खेळणारा बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानावर घसरला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 141 धावा करणारा पाकिस्तानचा कर्णधार अझर फलंदाजांच्या यादीत 23 व्या स्थानावर आला आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान तीन स्थानांनी प्रगती करत 72 व्या स्थानावर पोहचला आहे.
फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर स्टिव्ह स्मिथ असून दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय पहिल्या 10जणांमध्ये आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे. तसेच पॅट कमिन्स गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.