भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणना केली जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) मोहाली येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) पार पडला. भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने या सामन्यात विजय संपादन केला. भारताच्या विजयात रवींद्र जडेजाचे मोठे योगदान राहिले. त्याला या सामन्यातील त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यातही आले. यानंतर संघ हॉटेलवर गेला असताना हॉटेल व्यवस्थापन व भारतीय संघातर्फे केक कापून त्याच्या या कामगिरीचा जल्लोष साजरा करण्यात आला.
जडेजाने केली दमदार कामगिरी
सर या टोपणनावाने परिचित असलेल्या जडेजाने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी मोहाली कसोटीत केली. त्याने प्रथम फलंदाजी करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १७५ धावांची नाबाद खेळी केली. तसेच, गोलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात ५ व दुसऱ्या डावात ४ गडी बाद करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. एकाच कसोटीत शतक व ९ बळी अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. तसेच मोहाली कसोटीत सलग तिन्ही सामन्यात सामनावीर ठरण्याची कामगिरी त्याने केली.
https://www.instagram.com/p/Caw6uPgDINj/?utm_source=ig_web_copy_link
हॉटेलमध्ये केले सेलिब्रेशन
श्रीलंका संघावर विजय मिळाल्यानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये परतल्यावर भारतीय संघ व्यवस्थापन आणि हॉटेल व्यवस्थापन यांनी खास केक कापून त्याचे स्वागत केले. हॉटेलच्या गेट बाहेर ठेवलेला केक जडेजा याने स्वतः कापला. त्यानंतर संघातील इतर खेळाडू व प्रशिक्षकांनी त्याला केक भरवला. तत्पूर्वी, सामन्यानंतर मयंक अगरवाल याने त्याची मुलाखत घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-