प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना बेंगलूरु बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स असा रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात पराभूत झाले होते. बेंगलूरु बुल्स घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये सरासरी कामगिरी करू शकला होता. जयपूरने खेळलेल्या तीन सामन्यात एक विजय तर दोन पराभव स्वीकारले आहेत.
जयपूरसाठी त्याचे रेडर चिंतेची बाब ठरत आहेत. जयपूरचा मुख्य रेडर जसवीर सिंग तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. दुसरा मुख्य रेडर के. सिल्वामाणी जायबंदी असल्याने खेळू शकलेला नाही. तिसरा रेडर पवन कुमार याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. या संघाच्या डिफेन्सची दारोमदार मंजीत चिल्लरवर आहे. मंजीतने पुणेरी पलटण विरुद्ध चांगला खेळ करून सामना जिंकून दिला होता. या सामन्यानंतर मंजीत चांगली कामगिरी करू शकला नाही.
बेंगलूरु बुल्स संघाची परिस्थिती देखील जयपूर सारखीच आहे. या संघाचा कर्णधार रोहीत रेडींगमध्ये गुण मिळवत आहे. त्याला बाकीच्या खेळाडूंनी साथ दिलेली नाही. या संघाचा दुसरा रेडर अजय कुमार याच्या कामगिरीत सातत्य नाही याचा या संघाला फटका बसला आहे. रविंदर पहल, अजय कुमार, आशिष सांगवान यांनी चांगली कामगिरी केली तर हा सामना बेंगलूरु बुल्स जिंकेल .
मंजीत चिल्लर त्याच्या भूतपूर्व संघाविरुद्ध कसा खेळ करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. बेंगलूरु बुल्सचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांचा अगोदरचा आवडता खेळाडू मंजीत चिल्लर विरुद्ध या संघातील त्यांचा कर्णधार रोहीत कुमार असा हा सामना रंगणार आहे.