इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा संस्मरणीय शेवट केला आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत विजयासह आतंरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला.
अँडरसननं आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम रचले. त्याच्या कारकिर्दीत असं फार कमी वेळा झालं, जेव्हा तो मोठ्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा ॲशेस मालिकेपूर्वी अँडरसनची बरगडी तुटली होती. मात्र असं असतानाही तो ॲशेसमध्ये खेळला होता!
2010-11 च्या ॲशेस मालिकेपूर्वी अँडरसननं चक्क बॉक्सिंगमध्ये हात आजमावला होता. या मालिकेपूर्वी इंग्लंडचं प्रशिक्षण शिबिर जर्मनीत होतं. त्या दरम्यान अँडरसनची संघातील सहकाऱ्यासोबत बॉक्सिंगची मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेमलेटनं अँडरसनला जखमी केलं होतं. मजबूत शरीरयष्टी असलेल्या ट्रेमलेटनं बॉक्सिंग सामन्यात इतके जोरदार फटके हाणले, की त्यामुळे अँडरसनच्या बरगड्याच मोडल्या.
ॲशेस मालिकेपूर्वी अँडरसनच्या दुखापतीबद्दल ट्रेलमेटनं खेद व्यक्त केला होता. तो म्हणाला की, “जिमी त्यावेळी माझ्यापेक्षा 25 किलोनं कमी होता. त्याच्यावर कठोर हल्ला करणं योग्य नव्हतं. मला नंतर खूप वाईट वाटलं. या दुखापतीमुळे अँडरसनला ॲशेसमधील काही सामन्यांना मुकावे लागेल, असं सर्वांना वाटत होतं. पण तसं झालं नाही, अँडरसननं तो फायटर असल्याचं सिद्ध केलं आणि संपूर्ण मालिकेत 24 विकेट घेतल्या.
जेम्स अँडरसनला त्याच्या शेवटच्या कसोटीत अतिशय संस्मरणीय निरोप मिळाला. त्यानं 2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. याच मैदानावर त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. लॉर्ड्सवर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अँडरसनला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. जेम्स अँडरसननं आपल्या कारकिर्दीत एकूण 188 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याच्या नावावर 704 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
असा गोलंदाज पुन्हा होणे नाही! जेम्स अँडरसनचे क्रिकेटमधील असे रेकॉर्ड, जे कोणालाही मोडता येणे अशक्य
कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत! जेम्स अँडरसननं विजयासह घेतला निरोप
“तुझी 22 वर्षांची कारकीर्द…”, जेम्स अँडरसनसाठी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट