महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
जिमी अँडरसननं आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 187 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 700 विकेट घेतल्या आहेत. आता जेव्हा तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्याकडे शेन वॉर्नचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल. वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्ननं कसोटीत 708 विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनच्या नावावर सध्या 700 विकेट आहेत. म्हणजेच अँडरसननं 9 विकेट्स घेताच तो वॉर्नचा हा विक्रम मोडेल.
श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरननं कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीनं कसोटीत 133 सामने खेळून 800 विकेट्स घेतल्या आहेत. तर शेन वॉर्ननं 145 सामने खेळून 708 विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनच्या नावे 187 सामन्यांत 700 विकेट्स आहेत.
यासोबतच अँडरसनकडे 1000 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचीही संधी आहे. या दिग्गज गोलंदाजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 987 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच 13 विकेट्स घेतल्यानंतर त्याच्या नावावर 1000 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला जाईल. मुथय्या मुरलीधरननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1347 विकेट्स घेतल्या आहेत. तर शेन वॉर्नच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1001 विकेट्स आहेत.
जर अँडरसन आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात एका डावात 5 बळी घेण्यात यशस्वी ठरला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर येईल. आत्तापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा ही कामगिरी केली आहे. अँडरसन कसोटीत 32 वेळा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत.
वकार युनूस आणि रंगना हेराथ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 35 वेळा अशी कामगिरी केली आहे. मुरलीधरनबद्दल बोलायचे झालं तर, श्रीलंकेच्या या महान फिरकीपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 77 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्ननं 38 वेळा हा पराक्रम केला आहे.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी -10-14 जुलै, लॉर्ड्स
दुसरी कसोटी – 18-22 जुलै, नॉटिंगहम
तिसरी कसोटी – 26-30 जुलै, बर्मिंगहम
महत्त्वाच्या बातम्या –
ईशान किशननं रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार का दिला होता? समोर आलं धक्कादायक कारण
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या दिग्गज खेळाडूला बनवलं संघाचा मुख्य प्रशिक्षक
अभिषेक शर्मानं शुबमन गिलची बॅट उधार घेऊन ठोकलं शतक, काय आहे कारण?