भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (१२ ऑगस्ट) पासून लॉर्ड्सच्या मैदानात सुरू झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला, ज्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने क्रिकेटमधील एक अनोखा विश्वविक्रम त्याच्या नावे केला आहे.
अँडरसनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत तब्बल ३५००० पेक्षाही जास्त चेंडू टाकले आहेत. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव जलदगती गोलंदाज बनला.
अँडरसनच्या आधीही हा कारनामा ३ गोलंदाजांनी केलेला आहे. परंतु ते तीनही फिरकीपटू गोलंदाज आहेत. ज्यामध्ये मुथय्या मुरलीधरण यांनी सर्वाधिक ४४,०३९ चेंडू फेकले आहेत. त्यानंतर भारताचे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी आतापर्यंत ४०,८५० चेंडू फेकले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने ४०,७०५ चेंडू टाकून तिसरे स्थान प्राप्त केले होते.
जलदगती गोलंदाजीमध्ये अँडरसननंतर सर्वात जास्त चेंडू टाकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या कर्टनी वॉल्शच्या नावे आहे. ज्यांनी ३०,०१९ चेंडू फेकले आहेत. त्यानंतर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने २९,८६३ चेंडू फेकले आहेत. तसेच २९,२४८ फेकत ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या स्थानी आहेत.
दरम्यान, दुखापतीमुळे स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानच्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. १६४ कसोटी सामने खेळणाऱ्या अँडरसनने आतापर्यंत ६२३ विकेट्स घेतलेल्या आहेत. यातही अँडरसन सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तो एकमेव जलदगती गोलंदाज आहे. सर्वात जास्त विकेट मुरलीधरण यांच्या नावे आहेत, ज्यांनी एकूण ८०० विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न ७०८ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत.
यासोबत अँडरसनने आणखी एक विक्रम त्याच्या नावे केला आहे. तो म्हणजे, कोणत्याही मैदानावर सर्वात जास्त कसोटी सामने खेळण्याचा. अँडरसनने लॉर्ड्सच्या मैदानावर २५ सामने खेळले आहेत. यामुळे या यादीत श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. जयवर्धनेने कोलंबो मधील मैदानात २७ कसोटी सामने खेळलेत. तर, कुकने लॉर्ड्सच्या मैदानात २६ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–लॉर्ड्सचं मैदान अन् प्रथम फलंदाजीचा निर्णय जणू ठरलेलं समीकरण, तरीही रूटने का निवडली गोलंदाजी?
–टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम
–शार्दुल संघाबाहेर झाल्यानंतरही अश्विनला बसवलं बाकावर, कर्णधार कोहलीने सांगितल यामागचं कारण