इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेला आजपासून लॉर्डस कसोटीने सुरुवात झाली. या मालिकेत उभय संघांमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. न्यूझीलंड संघासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून ही मालिका महत्वाची आहे. तर दुसरीकडे आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्वतःला आजमावून पाहण्याची इंग्लंड संघाकडे संधी आहे.
या पार्श्वभूमीवर आजच्या लॉर्डस कसोटी सामन्याला सुरुवात झाली. मात्र हा सामना इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी खास ठरला. हा सामना खेळायला उतरताच त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली.
कूकच्या विक्रमाची बरोबरी
न्यूझीलंडविरुद्धचा आजचा कसोटी सामना जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील तब्बल १६१वा सामना ठरला. यासह इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमात त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकची बरोबरी केली. कूकने देखील इंग्लंडकडून १६१ कसोटी सामने खेळले आहेत. आता कूक आणि अँडरसन संयुक्तपणे अव्वल स्थानी असले तरी पुढील सामना खेळल्यावर अँडरसन कूकला मागे टाकू शकतो.
याशिवाय इतर काही विक्रम देखील आगामी काळात अँडरसनच्या निशाण्यावर असतील. ३९ वर्षीय अँडरसन १००० प्रथम श्रेणी बळी घेण्यापासून अवघे ८ बळी दूर आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमात तो भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर पासून केवळ आठ सामने दूर आहे. त्यामुळे आगामी काळात हे विक्रम देखील अँडरसनच्या नावे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात.
पहिल्याच सत्रात पटकावला किवी कर्णधाराचा बळी
दरम्यान, या विक्रमी कसोटीत जेम्स अँडरसनने झकास सुरुवात केली. त्याने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला स्वस्तात बाद केले. केन विलियम्सन ३३ चेंडूत १३ धावांवर खेळत असतांना अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मात्र इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीला झटके दिले असले तरी पाहुण्या न्यूझीलंडने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ४५ षटकांत ३ बाद १३२ अशी मजल मारली आहे. त्यामुळे किवी संघाला कमी धावसंख्येत रोखायचे असल्यास अँडरसनची भूमिका इंग्लंडसाठी महत्वाची ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर; विराट-रोहित या स्थानावर, तर सांघिक क्रमवारीत भारत
कमनशिबी आरसीबी! या पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी