लॉर्ड्स येथे इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुल या भारतीय सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी १२६ धावांची भागीदारी रचली. याच दरम्यान रोहित शर्माने अनेक नव्या विक्रमांची नोंद केली.
रोहितचे सर्वांगसुंदर अर्धशतक
नॉटिंघम कसोटीच्या दोन्ही डावात चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याची भरपाई केली. केएल राहुलसोबत सर्वप्रथम त्याने शतकी भागीदारी रचली. त्यानंतर, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील बारावे अर्धशतक पूर्ण केले. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शतक ठोकणारा १० वा भारतीय फलंदाज होण्यापासून तो वंचित राहिला. जेम्स अँडरसनने त्याला ८३ धावांवर त्रिफळाचित केले. रोहितने आपल्या खेळीमध्ये ११ चौकार व एक षटकार लगावला.
विदेशात रोहितची अफलातून कामगिरी
पूर्णवेळ सलामीवीर झाल्यापासून रोहितने आतापर्यंत २२ डावांमध्ये सलामी दिली. विशेष म्हणजे या २२ डावांमध्ये तो केवळ तीन वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. या काळात त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही पाच सामने खेळले आहेत. आकडेवारीचा विचार केल्यास त्याने या २२ डावात ६१.२५ च्या अफलातून सरासरीने १२२५ धावा उभारल्या आहेत.
पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. रोहित व राहुल या सलामी जोडीने १२६ धावांची मोठी सलामी दिली. रोहित ८३ धावा काढून परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा जास्त काळ टिकू शकला नाही व ९ धावा काढून माघारी परतला. अखेरच्या सत्राचा खेळ सुरू असताना राहुल ८३ व कर्णधार विराट कोहली ९ धावांवर नाबाद होते. इंग्लंडसाठी दोन्ही बळी अनुभवी जेम्स अँडरसनने मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’चा एकच पण कडक षटकार, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळाली जागा
लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ