भारतीय क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामागे एका गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जम्मू-काश्मिरने मध्य प्रदेशचा ५६ धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हा विजय जम्मू-काश्मिरच्या इतिहासातील महत्वपूर्ण क्षण ठरला. त्यांचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.
नबीने या सामन्यातील पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत एकूण १२ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
नबी सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मध्य प्रदेशविरुद्धही त्याने लयीत असल्याचे सिद्ध केले. मागील हंगामात त्याने खेळलेल्या १९ प्रथम श्रेणीच्या सामन्यात ९७ विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्यात मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जम्मू-काश्मिरने फलंदाजी करत पहिल्या डावात १९४ धावा केल्या. त्यामध्ये शुभम खजुरीयाच्या ६० धावा सर्वोच्च ठरल्या. मध्य प्रदेशच्या कुलदीप सेनने सर्वाधिक अशा ५ विकेट्स घेतल्या.
मध्य प्रदेशचे फलंदाज नबीसमोर फार काळ टीकलेच नाही. त्यांचा पहिला डाव १५२ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यश दुबेने केलेल्या ५८ धावांमुळे त्यांना समाधानकारक धावा करता आला. यामध्ये नबीने १८.४ षटकात ४० धावा देत ७ विकेट्स घेतल्या.
आघाडी असूनही जम्मू-काश्मिरच्या दुसऱ्या डावाची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांनी पहिल्या ५ विकेट्स ७३ धावसंख्येवरच गमावल्या. कर्णधार पारस डोग्रा आणि अब्दुल समादने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला वंशज शर्मा हा शेवटपर्यंत खेळला. त्याने नाबाद ५४ धावा करताना दहाव्या विकेटसाठी सुनिल कुमारसह ६५ धावांची भागीदारी केली.
मध्य प्रदेशला २९१ धावसंख्येचे लक्ष्य मिळाले, मात्र नबीसमोर त्यांचे काही चालले नाही आणि त्यांचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. उपांत्य फेरीत ते बंगाल विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यामधील विजयी संघाविरुद्ध खेळेल. हा सामना २४-२८ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल.






