गोवा: तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला ३-२ असे हरवून फॉर्मात असलेल्या जमशेदपूर एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील दुसरे स्थान आणखी मजबूत केले. तसेच हैदराबाद एफसीनंतर उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदारी पेश केली. जॉर्डन मरेचा लेट गोल जमशेदपूरच्या विजयात मोलाचा ठरला.
फातोर्डातील पीजेएन स्टेडियमवर शुक्रवारी तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला तरी नॉर्थ ईस्टने चांगलेच झुंजवले. या सामन्यात तब्बल पाच गोलांची नोंद झाली. त्यात जमशेदपूरची सरशी झाली. पाचपैकी चार गोल उत्तरार्धात झाले. त्यातील चौथा गोल निर्णायक ठरला. ३५व्या मिनिटाला सिमीनीन डाँगेलने जमशेदपूर एफसीला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत ग्रेग स्टीवर्टने त्यात भर घातली. त्याने ५९व्या मिनिटाला गोल केला. २-० असा आघाडीवर असलेला जमशेदपूर एफसी मोठा विजय नोंदवेल, असे वाटत होते. मात्र, लालडनमाविया (६६व्या मिनिटाला) आणि मार्सिन्हो यांनी (६८व्या मिनिटाला) दोन मिनिटांच्या फरकाने दोन गोल करतानला नॉर्थ ईस्टला २-२ अशी बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच ८५व्या मिनिटाला जॉर्डन मरे याने केलेला लेट गोल निर्णायक ठरला.
शुक्रवारच्या विजयासह जमशेदपूर एफसीने यंदाच्या हंगामातील एकूण विजयांची संख्या दहावर नेली. आठव्या हंगामात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान त्यांच्यासह हैदराबादला जातो. नॉर्थ ईस्टवर मात करताना जमशेदपूरने १७ सामन्यांतून ३४ गुण मिळवत दुसरे स्थान आणखी मजबूत केले. तसेच आठव्या हंगामात विजयाचा चौकार लगावला. जमशेदपूरने विजयाची दशमी साजरी करताना अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी (१८ सामन्यांत ३५ गुण) आणि त्यांच्यातील गुणफरक केवळ एकावर आणला.
नॉर्थ ईस्ट युनायटेडने चुरशीचा खेळ केला तरी त्यांना आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. १९ सामन्यांत केवळ १३ गुण मिळवलेला हा क्लब आता दहाव्या स्थानी फेकला गेला आहे.
निकाल : जमशेदपूर एफसी ३(सिमीनीन डाँगेल ३५व्या मिनिटाला, ग्रेग स्टीवर्ट ५९व्या मिनिटाला, जॉर्डन मरे ८५व्या मिनिटाला) विजयी वि. नॉर्थ ईस्ट एफसी २(लालडनमाविया ६६व्या मिनिटाला, मार्सिन्हो ६८व्या मिनिटाला).
महत्वाच्या बातम्या-
आयएसएल: मुंबई सिटी एफसीच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम; दुबळ्या एफसी गोवाला लोळवण्यास सज्ज
केरला ब्लास्टर्स अन् चेन्नईयन एफसीसाठी ‘करा वा मरा’ सामना; उपांत्य फेरीसाठी कडवी चुरस
जमशेदपूरला वेध सेमीफायनलचे; नॉर्थ ईस्ट युनायटेडशी भिडणार शुक्रवारी