जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीने शुक्रवारी मुंबई सिटी एफसीवर एकमेव गोलने मात केली. निर्धारीत वेळ संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना ब्राझीलचा मध्यरक्षक एमरसन गोम्स डी मौरा उर्फ मेमो याने केलेला गोल निर्णायक ठरला. या विजयासह जमशेदपूरने पाचव्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर 80व्या जमशेदपूरला आणखी एक फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचाने त्यावर मारलेला चेंडू अडविण्यासाठी मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग पुढे सरसावला. त्याने पंच मारलेला चेंडू थेट मेमोकडे गेला. मेमोने उजवीकडून अचूक हेडिंग करीत चेंडू नेटमध्ये मारला.
जमशेदपूरने 15 सामन्यांत सहावा विजय मिळविला असून आठ बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 23 गुण झाले. त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले, पण चौथ्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याविरुद्धची पिछाडी त्यांनी एका गुणापर्यंत कमी केली. बेंगळुरू एफसी (14 सामन्यांतून 31 गुण) आघाडीवर आहे. मुंबई सिटीचे 27 गुण व दुसरे स्थान कायम राहिले. मुंबईला 15 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. आठ विजय व तीन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवा (14 सामन्यांतून 25) तिसऱ्या, तर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (15 सामन्यांतून 24) चौथ्या स्थानावर आहे.
पूर्वार्धात दोन्ही संघांनी चांगले प्रयत्न केले. सहाव्या मिनिटाला मारीओ आर्क्वेस रॅफेल बॅस्तोसकडून चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात धसमुसळा खेळ केला. त्यामुळे मुंबईला फ्री करिक मिळाली, पण त्यावर काही घडले नाही. आठव्या मिनिटाला जमशेदपूरच्या रॉबीन गुरुंगने बॅस्तोसला पाडले. त्यामुळे गुरुंगला यलो कार्ड दाखविण्यात आले.
अकराव्या मिनिटाला मुंबईच्या विघ्नेश दक्षिणामुर्तीने फारुख चौधरीला रोखले. त्यामुळे जमशेदपूरला फ्री किक मिळाली, पण ती वाया गेली. सर्जिओ सिदोंचाने मारलेला चेंडू बॉक्समध्ये गेला. तो दक्षिणामुर्तीनेच बाहेर घालविला. परिणामी मिळालेला कॉर्नर मुंबईने सहज रोखला.
मुंबईला 15व्या मिनिटाला फ्री किक मिळाली. प्रतिक चौधरीने डावीकडे मोडोऊ सौगौ याला पाडले होते. फ्री किक घेताना पाऊलो मॅचादो मात्र अचूक फटका मारू शकला नाही. त्यामुळे चेंडू गोलपोस्टवरून गेला.
जमशेदपूरच्या फारुख चौधरीने 23व्या मिनिटाला बॉक्सबाहेर चेंडू मिळाल्यानंतर फटका मारला, पण तो थेट मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याच्याकडे गेला.
मुंबईच्या बीपीन सिंगने 27व्या मिनिटाला दोन बचावपटूंना चकवित बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने सौगौला पास देण्यासाठी धनचंद्र सिंगला चकविण्याचा प्रयत्न केला, पण धनचंद्रने चेंडू बाहेर घालविला. त्यामुळे मुंबईला कॉर्नर मिळाला, पण त्यावर काही घडले नाही.
मॅचादोने 30व्या मिनिटाला चांगली संधी दवडली. बॅस्तोसने उजवीकडून ही चाल रचत त्याला क्रॉस पास दिला होता. 40व्या मिनिटाला जमशेदपूरच्या बिकाश जैरूने डावीकडून चेंडू मारला. तो दक्षिणामुर्तीला नीट रोखता आला नाही. सहा यार्ड बॉक्समध्ये चेंडू होता, पण मुंबईच्या सुदैवाने जमशेदपूरचा खेळाडू योग्य जागी नव्हता. त्यामुळे अमरींदरने चेंडू वेळीच ताब्यात घेतला.
प्रतिक चौधरीने 42व्या मिनिटाला सहकारी गोलरक्षक सुब्रत पॉल याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण सौगौ त्याच्या मागेच होता. सुब्रतने मात्र दक्ष राहात पुढे सरसावत चेंडूवर ताबा मिळविला. त्यात सौगौला थोडी दुखापत झाली. मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती.
दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला मुंबईच्या मिलान सिंगने उजवीकडे जमशेदपूरच्या पाब्लो मॉर्गाडोला पाडले. त्यामुळे फ्री किक देण्यात आली. सिदोंचाने ती घेत चेंडू बॉक्समध्ये मारला, पण मुंबईच्या ल्युचीयन गोऐन याने हेडींग करीत चेंडू धोकादायक क्षेत्रातून बाहेर घालविला.
सिदोंचाने 54व्या उजवीकडे कॉर्नर घेत मॉर्गाडोसाठी संधीनिर्माण केली, पण या चालीचे फिनिशिंग होऊ शकले नाही. 66व्या मिनिटाला सिदोंचाने फ्री किकवर मैदानालगत बॉक्समध्ये चेंडू मारला. सुमित पासीने प्रयत्न केला, पण ल्युचीयनने त्याला रोखले. यातून चेंडू गुरुंगकडे गेला, पण त्यालाही ल्युचीयनने रोखले.
निकाल:
जमशेदपूर एफसी: 1 (मेमो 80) विजयी विरुद्ध मुंबई सिटी एफसी : 0