गोवा: इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२१-२१ पर्वात गुणतालिकेत अव्वल स्थान कोणाला मिळेल याचा फैसला सोमवारी (०७ मार्च) एटीके मोहन बागान आणि जमशेदपूर एफसी यांच्यातल्या लढतीनंतर होणार आहे. आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील हा अखेरचा साखळी सामना आहे. जमशेदपूर एफसीने या सामन्यात विजय मिळवल्यास किंवा ड्रॉ राखल्यास लीग शिल्ड त्यांना मिळेल, पण एटीके मोहन बागानला या सामन्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गोल फरकाने विजय मिळवावा लागेल. जमशेदपूरचे १९ सामन्यांत ४०, तर मोहन बागानचे ३७ गुण आहेत.
जमशेदपूर एफसीने सलग सहा सामने जिंकले आहेत आणि उद्याचा सामना जिंकून आयएसएलच्या इतिहासात सलग सात विजय मिळवणाऱ्या पहिल्या संघाचा मान पटकावण्याचा त्यांचा निर्धार असेल. दुसरीकडे मोहन बागानचा मागील १५ सामन्यांत एकही पराभव झालेला नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीतही अपराजित मालिका कायम राखून आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक १६ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम त्यांना खुणावत आहे. त्यामुळे हा सामना फक्त लीग शिल्डसाठी नसेल, तर दोन्ही संघांना मोठा विक्रम करण्याची संधी घेऊन आलेला आहे.
जमशेदपूरने मागील सामन्यात ओदिशा एफसीचा पराभव करून आयएसएलमध्ये सलग सहा सामने जिंकण्याच्या बंगलोर एफसीच्या विक्रमाशी बरोबरी केली. उद्याचा विजय एक नवा विक्रम नोंदवून जाईल. याशिवाय त्यांना आणखी एक विक्रम खुणावत आहे. जमशेदपूरने साखळी सामन्यात ४० गुण कमावले आहेत आणि आयएसएलच्या साखळी फेरीत सर्वाधिक ४० गुणांची कमाई करण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी बंगलोर एफसीने २०१७-१८ आणि एटीके मोहन बागान व मुंबई सिटी एफसी यांनी २०२०-२१मध्ये असा पराक्रम केला होता. त्यामुळे ड्रॉ किंवा विजय हा निकाल जमशेदपूरला एका वेगळ्या विक्रमाची नोंद करून देणारा ठरेल.
ओदिशाविरुद्धच्या ५-१ अशा विजयात नायजेरियन फॉरवर्ड डॅनिएल चूक्वूने दोन गोल केले होते. चिमाने आयएसएल २०२१-२२ मध्ये ९ गोल केले आहेत आणि त्यापैकी ७ हे जमशेदपूरसाठी आहेत. मोहन बागानसाठी ज्युआन फेरांडो व रॉय कृष्णा यांनी मागील सामन्यात गोल केले होते. जोनी कौको हा चांगल्या फॉर्मात आहे आणि लिस्टन कोलासो व मनवीर सिंग यांचीही कामगिरी सातत्यपूर्ण होत आहे. उभय संघ मागच्या वेळेस भिडले होते तेव्हा जमशेदपूरने २-१ असा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत
आयएसएल: माजी विजेत्या बंगलोर एफसीचा विजयी निरोप, सुनील छेत्रीचा निर्णायक गोल
केरला ब्लास्टर्सचे लक्ष्य सेमीफायनल निश्चितीचे; गोव्याशी गाठ