गोवा: गतविजेत्या मुंबई सिटी एफसीचे इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) यंदाच्या पर्वातील आव्हान संपुष्टात आले. हैदराबाद एफसीने २-१ अशा फरकाने ही लढत जिंकली आणि गुणतालिकेत ३८ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचा पराभव म्हणजे केरला ब्लास्टर्सचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले. आज मुंबई जिंकली असती अन् उद्या एफसी गोवाकडून केरलाचा पराभव झाला असता तर गतविजेत्यांना संधी होती. मात्र, पराभवामुळे मुंबईचा स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपला. त्यांना ३१ गुणांसह पाचव्या स्थानावरच समाधानी रहावे लागले. हैदराबादसाठी रोहित दानू ( १४ मि.) व जोएल चिनीजी (४१ मि.) यांनी गोल केले, तर मुंबईकडून एकमेव गोल मोर्ताझा फाल (७६ मि.)कडून आला.
हैदराबाद एफसीने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केल्यामुळे त्यांच्यासाठी आजची लढत ही फक्त सराव सामन्यासारखी होती. पण, गतविजेत्या मुंबई सिटी एफसीसाठी ही अखेरची संधी होती. केरला ब्लास्टर्सविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या उपांत्य फेरीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला. मुंबईच्या या आशांना १४व्या मिनिटाला मोठा धक्का बसला. मुंबई सिटीच्या खेळाडूंनी पेनल्टी बॉक्समध्ये केलेल्या चुकीचा फायदा हैदराबादच्या खेळाडूंनी उचलला आणि मोक्याच्या ठिकाणी उभ्या असलेल्या रोहित दानूने गोल केला. पहिल्या ३० मिनिटांत हैदराबादकडून चार ऑन टार्गेट प्रयत्न झाले, त्याउलट मुंबई सिटीकडून तसा एकही प्रयत्न झाला नाही.
३७व्या मिनिटाला विक्रम प्रताप सिंगकडून मुंबई सिटीसाठी पहिला ऑन टार्गेट प्रयत्न झाला, परंतु हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याच्या हातात तो सहज विसावला. ४१व्या मिनिटाला हैदराबादने आघाडी डबल केली. मोहम्मद यासीरने मध्यरेषेवरून पास केलेला चेंडू जोएल चिनीजीने अचूक टिपला. मुंबईचा बचावपटू त्याच्या शेजारी होता, परंतु तो त्याला रोखू शकला नाही. जोएलने सहज गोल करून हैदराबादची आघाडी २-० अशी मजबूत केली. ४५+१ मिनिटाला निखिल पूजारीने भक्कम बचाव करून मुंबई सिटीचा पहिला गोल टाळला. पहिल्या हाफमध्ये हैदराबादने वर्चस्व गाजवले.
दुसऱ्या हाफमध्येही हाती यश लागत नसताना मुंबई सिटीने ५५व्या मिनिटाला तीन बदल केले. पण, त्याचा रिझल्ट काही मिळताना दिसत नव्हता. मुंबई सिटीचा विक्रम सिंग आणि हैदराबादचा बचावपटू आकाश मिश्रा यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळत होती. विक्रमचा प्रत्येक प्रयत्न आकाश अयशस्वी ठरवत होता. ७६व्या मिनिटाला अखेर मुंबईला यश मिळाले. कॅसिओ गॅब्रिएलने फ्री किकवर दिलेला पास ६ यार्ड बॉक्सच्या आत असलेल्या मोर्ताझा फालने हेडरद्वारे चेंडू गोल जाळीत पाठवला. आता इथून सामन्यातील चुरस वाढताना दिसली. या गोलनंतर हैदराबाद पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात गेले आणि चेंडूवर अधिकाधिक ताबा राखण्याचा प्रयत्न करताना दिसले.
९०+२ मिनिटाला मुंबईने बरोबरीचा गोल जवळपास केला होता. डिएगो मौरिसिओने हेडरद्वारे केलेला प्रयत्न गोलजाळीच्या जवळून बाहेर गेला. मुंबईला १-२ अशा पराभवामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: माजी विजेत्या बंगलोर एफसीचा विजयी निरोप, सुनील छेत्रीचा निर्णायक गोल
आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू