गोवा: इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केलेल्या जमशेदपूर एफसीने शुक्रवारी ओदिशा एफसीवर दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा सलग सहावा विजय ठरला. ओदिशा एफसीला मात्र अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाने निरोप घ्यावा लागला. त्यांना २० सामन्यांत सहा विजयांसह २३ गुणांवर समाधान मानावे लागले. जमशेदपूरने ५-१ अशा विजयासह १९ सामन्यांत ४० गुणांची कमाई करून अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. जमशेदपूर एफसीकडून डॅनिएल चुक्वूने ( २३ मि. व २६ मि) दोन गोल, तर रित्विक दास ( ५४ मि.), जॉर्डन मरे ( ७१ मि.) आणि इशान पंडिता ( ८७ मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओदिशासाठी एकमेव गोल पॉल रामफंजौव्हा ( ४५+१ मि.) याने केला.
उपांत्य फेरीत स्थान पक्के केलेल्या जमशेदपूर एफसीने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. लीगचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ओदिशा एफसीला त्यांनी पहिल्या २६ मिनिटांतच धक्के दिले. २३व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने फ्री किक घेतली आणि त्याने भिरकावलेला चेंडू क्रॉस बारला आदळून माघारी फिरला. तो अडवण्यासाठी गोलरक्षक उजव्या बाजूने झुकला होता. पण, परत फिरलेला चेंडू गोलजाळीसमोरच उभ्या असलेल्या डॅनिएल चुक्वूच्या दिशेनं गेला आणि त्यानेही हेडरद्वारे तो गोलजाळीत पाठवून जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर २६व्या मिनिटाला ओदिशाच्या बचावफळीतील झालेल्या चुकीवर संधी साधून चुक्वूने ही आघाडी दुप्पट केली. ४५+१ मिनिटाला जमशेदपूरचे खेळाडू स्वतःच्याच पेनल्टीत चेंडूसोबत खेळत बसले आणि त्याचा फायदा ओदिशाला झाला. पेनल्टी बॉक्सबाहेरून पॉल रामफंजौव्हाने चेंडू गोलजाळीच्या दिशेने भिरकावला अन् जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेशच्या हाताला लागून गोलजाळीत गेला. पहिल्या हाफमध्ये ओदिशाने गोल करताना पिछाडी १-२ अशी कमी केली. पहिल्या हाफच्या खेळात जमशेदपूरने वर्चस्व गाजवले असले तरी ओदिशाने अखेरच्या क्षणाला गोल करून विजयाच्या आशा पल्लवीत केल्या.
मध्यंतरानंतर ओदिशाकडून चांगला खेळ झालेला पाहायला मिळाला, परंतु जमशेदपूरच्या आणखी एका गोलने त्यांचा आत्मविश्वास ढासळला. ५४व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने ओदिशाच्या खेळाडूंकडून चेंडू हिसकावला आणि तो रित्विक दासकडे सोपवला. रित्विकने आधी हेडरने चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर त्याने तो अप्रतिम रित्या गोलजाळीत पाठवला. जमशेदपूरने ३-१ अशी आघाडी मजबूत केली. ७१व्या मिनिटाला पुन्हा एकदा ओदिशाच्या बचावफळीत ढिसाळपणा दिसला अन् ग्रेग स्टीवर्टच्या क्रॉस पासवर जॉर्डन मरेने गोल करून जमशेदपूरचा चौथा गोल केला.
या पिछाडीवरून पुनरागमन करणे ओदिशासाठी अशक्यच होते. त्यात त्यांना आणखी एक धक्का बसला. ओदिशाचा प्रमुख खेळाडू जॉनथास क्रिस्टियन याला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड मिळाले आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. ७३ मिनिटानंतर ओदिशाला १० खेळाडूंसहच खेळावे लागले. ८५व्या मिनिटाला स्टीवर्टने जवळपास पाचवा गोल केलाच होता, परंतु चेंडू क्रॉस बारला आदळून माघारी फिरला. यावेळेस तो पुन्हा गोलजाळीत पाठवण्यासाठी जमशेदपूरचा खेळाडू समोर उभा नव्हता. पण, ८७ व्या मिनिटाला
जमशेदपूरच्या खेळाडूंनी पुन्हा सांघिक खेळ केला आणि इशान पंडिताने आणखी एका गोलची भर पाडली. लाल्दीलियाना रेंथलेईचा हा पास होता. जमशेदपूरने ५-१ असा विजय पक्का केला.
महत्त्वाच्या बातम्या-
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू