आगामी आयपीएलपूर्वी ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI नं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला IPL 2024 खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. बोर्डानं तो तंदुरुस्त झाल्याचं वैद्यकीय अपडेट जारी केलं. आता आयपीएलच्या आगामी मोसमात तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळू शकतो. यासह बीसीसीआयनं वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाबाबतही वैद्यकीय अपडेट जारी केलं. हे दोन्ही वेगवान गोलंदाज दुखापतीतून सावरत आहेत.
30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ ऋषभ पंतचा भीषण रस्ता अपघात झाला होता. आयपीएल 2024 च्या आधी पंतच्या संदर्भात बीसीसीआयनं म्हटलं आहे की, 14 महिन्यांचं पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेनंतर ऋषभ पंतचा आगामी IPL साठी संघात समावेश केला जाईल. यासह पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणूनही तंदुरुस्त घोषित करण्यात आलंय.
प्रसिध कृष्णाबाबत जारी केलेल्या अपडेटमध्ये बीसीसीआयनं म्हटलं आहे की, वेगवान गोलंदाजानं 23 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या डाव्या प्रॉक्सिमल क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया केली. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर देखरेख केली जात आहे. लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू होईल. तो आयपीएल 2024 मध्ये भाग घेऊ शकणार नाही.
मोहम्मद शमीबाबत वैद्यकीय अपडेट जारी करताना बोर्डानं म्हटलं की, “या वेगवान गोलंदाजानं 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या उजव्या टाचेच्या समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सध्या, BCCI चं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. तो आगामी IPL 2024 मधून बाहेर पडला आहे.”
ऋषभ पंतबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी सांगितलं होतं की, तो 2024 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेचा दावेदार आहे. मात्र, यासाठी त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचवेळी, शमीबाबत त्यांनी माहिती दिली होती की तो घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव IPL 2024 च्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता
IPL 2024 मध्ये तुमच्या आवडत्या संघाचं नेतृत्व कोणता खेळाडू करेल, जाणून घ्या एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज विवाह बंधनात अडकला, झिम्बाब्वेमध्ये फिल्मी स्टाइलनं केलं होतं प्रपोज