जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम (आयपीएल २०२२) मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. स्पर्धेमध्ये दोन नवीन संघ सहभागी झाल्याने स्पर्धेची उत्सुकता आणखी वाढली आहे. या जगविख्यात स्पर्धेमध्ये खेळण्याचे जगभरातील खेळाडूंचे स्वप्न असते. आयपीएल लिलावात बोली लागल्यानंतर खेळाडू ही मानाची स्पर्धा खेळण्यासाठी पात्र होतात. मात्र, आयपीएल लिलावात कोट्यावधी रुपये मिळूनही इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने (Jason Roy) अचानकपणे आपण आयपीएल खेळण्यासठी उपलब्ध असणार नाही असे जाहीर केले आहे. त्याला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने दोन कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.
अचानक घेतली माघार
इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघातील प्रमुख सलामीवीर असलेल्या जेसन रॉयवर मेगा लिलावात प्रथमच आयपीएलमध्ये सामील होत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने दोन कोटी रुपयांची बोली लावली होती. तो शुबमन गिलसह संघासाठी डावाची सुरुवात करेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, रॉयने २८ फेब्रुवारी रोजी त्याने आपण या हंगामात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, रॉय हा अधिक दिवस बायो-बबलमध्ये राहण्यासाठी उत्सुक नाही. याच कारणामुळे त्याने स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. गुजरात टायटन्सने अद्याप त्याच्याजागी कोणत्याही खेळाडूची घोषणा केली नाही.
दुसऱ्यांदा घेतला हा निर्णय
रॉय याने लिलावात निवड झाल्यानंतरही स्पर्धा न खेळण्याचा हा निर्णय दुसऱ्यांना घेतला आहे. यापूर्वी २०२० आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने दिड कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले होते. मात्र, त्याने असेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळण्यासाठी नकार दिला होता. विशेष म्हणजे रॉय नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये शानदार फॉर्ममध्ये दिसला होता. रॉयच्या या निर्णयामुळे गुजरात संघाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-