सोमवारी (२७ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. सनरायझर्स हैदराबाद संघाची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता, राजस्थान रॉयल्स संघ एकहाती विजय मिळवून गुणतालिकेत आघाडी घेणार असा अंदाज व्यक्त केला आहे होता. परंतु जेसन रॉयने लक्षवेधी कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले. यासह सनरायझर्स हैदराबाद संघाला शानदार विजय मिळवून दिला.
तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये उतरला रॉय
सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या संघात मोठे बदल केले होते.सर्वात मोठा बदल म्हणजे डेव्हिड वॉर्नरला त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते. हे पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे सर्वांचेच लक्ष जेसन रॉयच्या खेळावर टिकून होते. त्याने देखील चाहत्यांना निराश न करता तुफानी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
जेसन रॉयने तब्बल ३ वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत पुनरागमन केले होते. तसेच, हैदराबाद संघासाठी हा जेसन रॉयचा पहिलाच सामना होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी १६५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना रॉयने तुफानी खेळी करत ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. यासह केन विलियमसन सोबत महत्वाची भागीदारी करून त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या विजयाचा पाया रचला.
अशी राहिली आहे आयपीएल कारकीर्द
जेसन रॉयच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती. त्याने गुजरात लायन्स संघातून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला दिल्ली संघात स्थान मिळाले होते. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने ९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला २३९ धावा करण्यात यश आले. यादरम्यान दोन वेळेस त्याने अर्धशतक झळकावले आहे.