26 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं खूप मोठा इतिहास रचला. बुमराह या कसोटी मालिकेत शानदार फार्मात आहे. तो मालिकेत 21 विकेटसह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. आता तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज ठरला!
बुमराहनं गाबा कसोटीत 94 धावांत 9 बळी घेत आपल्या रेटिंग गुणांमध्ये 14 गुणांची भर घातली. आता त्याचे 904 रेटिंग गुण झाले आहेत. याआधी नुकताच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विननं डिसेंबर 2016 मध्ये मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर एवढ्या गुणांपर्यंत मजल मारली होती. बुमराहनं या मालिकेत आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे त्यानं आतापर्यंत एकूण 48 रेटिंग गुणांची कमाई केली.
गोलंदाजांच्या क्रमवारीत कागिसो रबाडा (856) आणि जोश हेझलवूड (852) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स 822 गुणांसह चौथ्या स्थानावर असून निवृत्त भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 789 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
ताज्या क्रमवारीत मोहम्मद सिराज एक स्थान पुढे सरकून 24व्या क्रमांकावर पोहोचला. विशेष म्हणजे, ट्रॅव्हिस हेड गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये सामील झाला आहे. रवींद्र जडेजाला 4 स्थानांचं नुकसान झालं. तो आता 10 व्या क्रमांकावर घसरला आहे. मिचेल स्टार्क 11व्या, तर नॅथन लायन 7व्या क्रमांकावर आहे. मॅट हेन्री सहाव्या, श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या आठव्या आणि पाकिस्तानचा नोवान अली 9व्या स्थानावर आहे.
कसोटीत सर्वाधिक रेटिंग गुणांचा विश्वविक्रम इंग्लंडच्या सिडनी बर्न्सच्या नावावर आहे. त्यांनी 1914 मध्ये 932 गुण मिळवले होते. तर इंग्लंडचा जॉर्ज लोहमन 931 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजांच्या या विशेष यादीत पाकिस्तानचा विश्वविजेता कर्णधार इम्रान खान 922 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन 920 गुणांसह चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा 914 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
अक्षर पटेलचा मुलगा ‘हक्ष’ या नावाचा अर्थ काय? हिंदू पुराणांशी आहे खास संबंध
मिशेल स्टार्क या खास रेकॉर्डपासून फक्त 5 विकेट दूर, लवकरच होणार महान खेळाडूंच्या क्लबमध्ये एंट्री!
चॅम्पियन्स ट्रॉफीचा नॉकआऊट किंवा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?