गुरुवारी (11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं कहरच केला. मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजानं बंगळुरूच्या पाच फलंदाजाना बाद केलं. यासह बुमराहनं आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. तो आरसीबीविरुद्ध पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय. याशिवाय बुमराहनं आशिष नेहराचा 9 वर्ष जुना विक्रमही मोडला.
आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या. मुंबईनं हे लक्ष्य 15.3 षटकांत 3 गडी गमावून गाठलं. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
बुमराहनं 4 षटकात 21 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात दोन वेळा पाच बळी घेणारा तो तिसरा भारतीय आणि एकूण चौथा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या यादीत जेम्स फॉकनर, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार हे अन्य गोलंदाज आहेत.
आयपीएलमध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारे वेगवान गोलंदाज
जेम्स फॉकनर
जयदेव उनाडकट
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह
जयप्रीत बुमराह आरसीबीविरुद्ध एका डावात पाच बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं 2015 मध्ये आशिष नेहराचा सीएसकेसाठीचा 4/10 हा विक्रम मोडला. त्याचवेळी आरसीबीविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत बुमराहनं रवींद्र जडेजा, संदीप शर्मा आणि सुनील नारायण यांना मागे टाकलं. बुमराहनं आरसीबीविरुद्ध सर्वाधिक (29) बळी घेतले आहेत.
आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक बळी
जसप्रीत बुमराह – 29
रवींद्र जडेजा, संदीप शर्मा – 26
सुनील नारायण – 24
आशिष नेहरा, हरभजन सिंग- 23
बुमराहने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीला बाद केलं. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये त्यानं कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि त्यानंतर एका जबरदस्त यॉर्करवर महिपाल लोमरला पायचीत केलं. 19 व्या षटकात सौरव चौहान आणि विजयकुमार वैशाख यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत त्यानं पाच बळींचा टप्पा पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
नाव मोठं, लक्षण खोटं! ‘बिग शो’ मॅक्सवेलचा आयपीएलमधील फ्लॉप शो जारीच
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!