या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनच कांगारु फलंदाजांवर आपला धाक जमवला आहे. तो मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याच्यावर कोणताही फलंदाज वरचढ ठरू शकलेला नाही. मात्र चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बॉक्सिंग डे कसोटीद्वारे पदार्पण करणाऱ्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टासनं बुमराहला अक्षरश: फोडून काढलं!
पहिल्या तीन कसोटीत 21 बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला युवा सॅम कॉन्स्टन्सनं कोणतीही संधी दिली. कॉन्स्टासनं जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाजाचा अगदी सहज सामना केला. त्यानं बुमराहविरुद्ध अनेक आक्रमक शॉट्स खेळले. यादरम्यान बुमराहनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महागडं षटकही टाकलं.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी बुमराहनं त्याच्या चौथ्या षटकात 14 धावा दिल्या. यानंतर त्यानं सहाव्या षटकात चक्क 18 धावा दिल्या. याआधी आपल्या कसोटी कारकिर्दीत बुमराहनं एका षटकात एवढ्या धावा कधीच दिल्या नव्हत्या. 18 धावांचे हे षटक बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात महागडं षटक आहे.
यापूर्वी 2020 मध्ये बुमराहनं मेलबर्नच्याच मैदानावर एका षटकात 16 धावा दिल्या होत्या. त्यावेळी त्याच्याविरुद्ध नॅथन लायन आणि जोश हेझलवूड ही जोडी उभी होती. त्याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत बुमराहनं एका षटकात 16 धावा दिल्या होत्या. आता त्यानं 18 धावांचं षटक टाकून स्वत:चा सर्वात महागड्या षटकाचा रेकॉर्ड मोडला आहे.
या सामन्यात सॅम कॉन्स्टासनं बुमराहविरुद्ध आणखी एक मोठी कामगिरी केली. त्यानं बुमराहविरुद्ध षटकार ठोकून मोठा पराक्रम केला आहे. हे धक्कादायक आहे, कारण जसप्रीत बुमराहविरुद्ध कोणत्याही फलंदाजानं कसोटीत 1,112 दिवस आणि 4483 चेंडूंनंतर षटकार लगावला आहे. यापूर्वी 2021 मध्ये कॅमेरून ग्रीननं सिडनीमध्ये बुमराहविरुद्ध शेवटचा षटकार लगावला होता.
हेही वाचा –
कोहलीसोबतच्या बाचाबाचीवर सॅम कॉन्स्टासची प्रतिक्रिया, म्हणाला, “कोहलीनं जाणूनबुजून…”
कॉन्स्टासला धक्का मारणं विराटला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई
‘अरे जैस्सू…’, क्षेत्ररक्षणा दरम्यान रोहित शर्मा जयस्वालला झापला, पाहा VIDEO