भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हन संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे.
वास्तविक, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. टीम मॅनेजमेंटनं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला फिट ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडनं पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव केला. किवी संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ तिसरी कसोटी जिंकून क्लीन स्वीप टाळू इच्छितो.
भारतानं ही मालिका गमावली असली तरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं तिसरी कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. तिसऱ्या कसोटीत जर भारतीय संघ पराभूत झाला, तर संघाचं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाईल.
ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उभय संघांमधील पहिली कसोटी 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ 6 डिसेंबरपासून आमनेसामने येतील. तर मालिकेची तिसरी कसोटी 14 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळली जाणार आहे. ही कसोटी ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून ओळखली जाते. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळली जाणार आहे.
हेही वाचा –
विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी
टीम इंडियात फूट? रोहित-गंभीरमध्ये वाद? मालिका पराभवानंतर संघात गटबाजी
‘स्ट्राइक रेट आणि…’, एलएसजी केएल राहुलला का रिटेन करणार नाही? अहवालात मोठा खुलासा