भारतीय क्रिकेट संघानं टी20 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघानं अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. भारतानं दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे.
जेतेपद पटकावल्यानंतर मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं सर्वांना चकित केलं आणि आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टी20 मध्ये भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल, याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रश्नांवर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतीय संघानं टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. जय शाह यांनी आपल्या संवादात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांना रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताच्या पुढील टी20 कर्णधाराबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नावर जय शाह म्हणाले, “कर्णधारपदाचा निर्णय निवडकर्ते घेतील. चर्चेनंतर ते जाहीर करू. तुम्ही हार्दिकबद्दल विचारलं. त्याच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आम्ही आणि निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तो विश्वासाला पात्र ठरला.”
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर कोणता खेळाडू भारतीय संघाच्या टी20 संघाची धुरा सांभाळणार आहे, हे जय शाह यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र त्यांनी हार्दिक पांड्याच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. अशा परिस्थितीत हार्दिकला भारतीय संघाचा पुढील टी20 कर्णधार बनवलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे.
हार्दिक पांड्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानं या सामन्यात शेवटच्या षटकात 16 धावा वाचवल्या. या षटकात त्यानं धोकादायक डेव्हिड मिलरचीही विकेट घेतली. हार्दिकनं दबावाच्या परिस्थितीत तो संघासाठी किती उपयुक्त खेळाडू आहे, हे जेतेपदाच्या सामन्यात सिद्ध केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“फायनलमधील विराट कोहलीच्या खेळीनं भारताला अडचणीत आणलं होतं”, संजय मांजरेकर पुन्हा बरळले
भारतीय महिला संघानं उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा! एकमेव कसोटीत 10 गडी राखून दणदणीत विजय
टी20 वर्ल्डकपच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; भारतीय खेळाडूंचा दबदबा तर अफगाण खेळाडूंनाही स्थान