भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) गुरुवारी (१० जून) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान दिले गेले आहे. परंतु जयदेव उनाडकट आणि राहुल तेवतिया यांच्यावर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
संधीच्या प्रतीक्षेत जयदेव उनाडकट
वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. डाव्या हाताच्या या गोलंदाजाने १० टी-२० सामने देखील खेळले आहेत. परंतु २०१८ नंतर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने ८९ सामन्यात ३२७ गडी बाद केले आहेत. तर १५० ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात त्याला १८२ गडी बाद करण्यात यश आले आहे.
२०१९-२० च्या रणजी हंगामात सौराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने ६७ गडी बाद केले होते. या हंगामात सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. आयपीएल २०२१ स्पर्धेत उनाडकटने ४ सामन्यात ४ गडी बाद केले होते. अशा विलक्षण कामगिरीनंतरही उनाडकटऐवजी बीसीसीआयने चेतन सकारियावर विश्वास दाखवला आहे.
जयदेव उनाडकटने एका मुलाखतीत म्हटले होते की, “जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत मला स्थान देण्यात आले नव्हते, तेव्हा मला ते योग्य वाटले. कारण त्यावेळी सर्व खेळाडू फिट होते. पण नंतर जेव्हा बहुतेक खेळाडूंना दुखापत झाली आणि त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तेव्हा मला जाणवले की मलाही संधी मिळायला हवी होती.” उनाडकटला वाटत होते की, इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात संधी मिळाली असती. परंतु त्याला राखीव खेळाडूंमध्येही स्थान मिळाले नव्हते.
तेवतियालाही नाही मिळाले स्थान
राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाला देखील श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान देण्यात आले नाहीये. आयपीएल २०२० स्पर्धेत त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे राहुल तेवतियाला श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मलिकेत स्थान देण्यात आले नाही. या संघात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांना संधी देण्यात आली आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी भज्जीची ३०३ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला नापसंती; म्हणे, ‘त्याला बसवा बाहेर’
इशान आणि पंत यांच्यातील ‘मॅचविनर’ कोण? आकडेवारीचं झुकतं माप ‘या’ खेळाडूच्या बाजूने