तू कसोटीसाठी सज्ज आहेस; पुजाराच्या शब्दांनी भारावला होता ‘हा’ ३२७ बळी घेणारा गोलंदाज
भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. सध्या मुंबई येथे क्वारंटाईन असलेला संघ २ जून रोजी इंग्लंडसाठी उड्डाण भरेल. या लांबलचक दौऱ्यासाठी २० खेळाडूंचा संघ निवडसमितीने जाहीर केला आहे. मात्र या संघात जागा न मिळालेला सौराष्ट्रचा कर्णधार व अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने आपल्या सौराष्ट्र संघातील सहकारी आणि भारतीय संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा याचे कौतुक केले आहे.
पुजाराचे ते शब्द प्रेरणादायी
नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी दमदार कामगिरी केल्यानंतर सध्या उनाडकट घरी राहून सराव करत आहे. त्याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपला सहकारी चेतेश्वर पुजारा याचे कौतुक केले.
तो म्हणाला, “आम्ही खूप आधीपासून जवळचे मित्र आहोत. तो नेहमी मला सल्ला देत असतो. मागील रणजी हंगामात ज्यावेळी माझी कामगिरी चांगली झाली. त्यावेळी त्याने येऊन मला म्हटले होते की, तू कसोटी क्रिकेटसाठी तयार आहेस. हे शब्द माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते. मी खराब कामगिरी केली तरीही माझ्या चुका दाखवणारा तोच पहिला व्यक्ती असतो. काही वर्षांपूर्वी माझी कामगिरी खराब होत होती, त्यावेळी देखील मला त्याची मोलाची मदत झालेली.”
चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट दोघेही सौराष्ट्रसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळतात. उनाडकट याच्या नेतृत्वात सौराष्ट्रने २०१९-२०२० या रणजी हंगामात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली होती. उनाडकट या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ठरला होता.
भारतासाठी एक कसोटी खेळला आहे उनाडकट
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या उनाडकतने भारतासाठी आत्तापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. हा सामना २०१०मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळलेला. याव्यतिरिक्त त्याने भारतासाठी मर्यादित षटकांचे १७ सामने खेळताना २२ बळी मिळवले आहेत. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावेळी खेळला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३२७ बळी घेणारा उनाडकट मागील ११ वर्षांपासून भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची वाट पाहात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १८ शतके करणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूला करायची आहे द्रविड अन् लक्ष्मणसोबत फलंदाजी
ताबडतोड सलामी! भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोच्च सलामी भागीदारी करणाऱ्या ३ जोड्या