देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या जबरदस्त गोलंदाजीनं नाव कमावणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानं पुन्हा एकदा इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उनाडकट सलग दुसऱ्या मोसमात ससेक्सकडून खेळताना दिसणार आहे. तो शेवटच्या पाच सामन्यांसाठी क्लबचा भाग असेल. या क्लबमध्ये चेतेश्वर पुजाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, पुजारा देखील उनाडकट प्रमाणे सौराष्ट्रकडून खेळतो.
बीसीसीआयनं 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 32 वर्षीय जयदेव उनाडकटची निवड केलेली नाही. 4 संघांसाठी निवडण्यात आलेल्या 50 हून अधिक खेळाडूंमध्ये उनाडकटचं नाव नाही. अशा परिस्थितीत आता त्यानं इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडच्या ससेक्स क्लबनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये जयदेव उनाडकटनं संघात परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. उनाडकट म्हणाला, “येथे परत येऊन मला खरोखर आनंद होत आहे. हे माझं दुसरं घर आहे. या हंगामात संघानं चांगली कामगिरी केली. आशा आहे की आम्ही हंगामाच्या उत्तरार्धात आणखी चांगली कामगिरी करू आणि डिव्हिजन 1 मध्ये परत येऊ.”
जयदेव उनाडकटनं गेल्या काऊंटी हंगामात ससेक्सकडून तीन सामने खेळले होते. या दरम्यान त्यानं 5 डावात 86 षटकं टाकली आणि 11 बळी घेतले होते. ससेक्सला आशा आहे की, या उनाडकट हंगामातही आपला दीर्घ अनुभव दाखवून संघासाठी चांगली कामगिरी करेल.
या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजानं अगदी तरुण वयात भारताकडून कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर त्याला बरीच वर्ष संघाबाहेर बसावं लागलं. यानंतर त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. उनाडकटनं भारतासाठी 4 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉरमॅटसह त्याच्या नावावर एकूण 26 विकेट आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 114 सामन्यात 403 बळी घेतले आहेत.
हेही वाचा –
स्टीव्ह स्मिथनं आव्हान स्वीकारलं! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला हरवून इतिहास रचणार; म्हणाला, “यंदा…”
चेंडू मानेला लागताच थेट हॉस्पिटलमध्ये दाखल, अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूसोबत भीषण अपघात
गौतम गंभीरनं निवडली त्याची सर्वकालीन वर्ल्ड इलेव्हन, संघात तीन पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश






