WPL 2026 चा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांची नवी कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सच्या (Jemimah Rodrigues) नेतृत्वाखाली मैदानात उतरला. जेमिमा पहिल्यांदाच या लीगमध्ये संघाचं नेतृत्व करत आहे आणि पहिल्याच सामन्यात तिने इतिहास रचत आपली मैत्रीण स्मृती मंधानाचा (Smriti Mandhna) विक्रम मोडला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरताच जेमिमा रॉड्रिग्स वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये नेतृत्व करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. जेमिमाने वयाच्या अवघ्या 25 वर्षे 127 दिवसांत हे पद भूषवले. यापूर्वी हा विक्रम आरसीबीची (RCB) कर्णधार स्मृती मंधानाच्या नावावर होता. जेमिमाने आपल्या पहिल्याच सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते.
टॉस गमावल्यानंतर मुंबईची सुरुवात खराब झाली. अमेलिया केरला खातेही उघडता आले नाही, तर जी. कमलिनी 19 चेंडूत फक्त 16 धावा करू शकली. मात्र, नेट सायव्हर ब्रंटने 70 धावांची (46 चेंडू) शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 8 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 74 धावांची नाबाद खेळी खेळली. शेवटी निकोला कॅरीने 21 धावा जोडल्या, ज्यामुळे मुंबईने मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीसाठी नंदिनी शर्माने 2 विकेट्स घेतल्या, तर श्री चरणी आणि चिनले हेन्री यांनी प्रत्येकी 1-1 बळी मिळवला.






