सध्या महिला बिग बॅश लीगचा दहावा हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेच्या 20व्या सामन्यात ब्रिस्बेन हीट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सचे संघ आमनेसामने होते. ब्रिस्बेन हीटनं हा सामना 8 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेननं 20 षटकांत 6 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ॲडलेडचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून केवळ 167 धावाच करू शकला.
या सामन्यात ॲडलेडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रिस्बेनची सुरुवात चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. ग्रेस हॅरिस 33 धावा करून बाद झाली. तर जॉर्जिया रेडमायन केवळ 7 धावांचं योगदान देऊ शकली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिनं क्रीजवर येताच आपले इरादे स्पष्ट केले. रॉड्रिग्सनं स्फोटक फलंदाजी करत 40 चेंडूत 61 धावा ठोकल्या, ज्यात 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तिच्याशिवाय कर्णधार जेस जोनासेन (32) आणि नॅडिन डी क्लर्क (नाबाद 23) यांनी शानदार खेळी खेळली. अशाप्रकारे ब्रिस्बेननं 5 विकेट गमावून 175 धावा केल्या.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना या लीगमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्स संघाचा भाग आहे. मात्र या सामन्यात तिची कामगिरी अत्यंत खराब झाली. मोठं लक्ष्य पाहता चाहत्यांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु मंधानानं सर्वांना निराश केलं. तिला 6 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. शिखा पांडेनं तिची विकेट घेतली. कर्णधार ब्रिजेट पॅटरसन (नाबाद 61) आणि मॅडलिन पेना (नाबाद 59) यांनी सर्वाधिक धावा केल्या. दोघीही शेवटपर्यंत नाबाद राहिल्या, मात्र त्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकल्या नाहीत.
ॲडलेड स्ट्रायकर्सचा या हंगामातील हा चौथा पराभव आहे. संघ केवळ एका विजयासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्याचवेळी ब्रिस्बेन हीट सहा सामन्यांत 3 विजय आणि 3 पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मोडमध्ये होणार, या देशांत खेळले जाऊ शकतात भारताचे सामने
426 धावा….46 चौकार अन् 12 षटकार!! या फलंदाजाच्या वादळी खेळीनं मोडले सर्व रेकॉर्ड
आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब, लवकरच दाखवला जाईल बाहेरचा रस्ता