पुणे येथे सुरू असलेल्या वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत गुरुवारी (२६ मे) वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर असा सामना खेळला गेला. ट्रेलब्लेझर संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात संघाच्या बॅटर्सने शानदार कामगिरी करत १९० धावा धावफलकावर लावल्या. जेमिमा रोड्रिग्ज व एस मेघना यांनी शानदार अर्धशतके झळकावत संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. याचबरोबर त्यांनी एका नव्या विक्रमाची देखील नोंद केली.
शानदार शतकी भागीदारी
पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या ट्रेलब्लेझरला हा सामना ३१ पेक्षा जास्त धावांनी जिंकणे गरजेचे होते. तरच ते अंतिम फेरीत पोहोचू शकणार होते. मात्र, संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना केवळ एक धाव काढून माघारी परतली. त्यानंतर अनुभवी जेमिमा रोड्रिग्ज व एस मेघना यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. ही वुमेन्स टी२० चॅलेंजमधील केवळ दुसरी शतकी भागीदारी आहे. यापूर्वी स्मृती मंधना व हरलीन देओल यांनी २०१९ मध्ये ११९ धावांची भागीदारी केलेली.
सामना ट्रेलब्लेझरच्या नावे तर वेलोसिटी फायनलला
१९१ धावांचे आव्हान पार करताना वेलोसिटी संघाची सुरुवात चांगली झाली. शफाली वर्मा व लॉरा वॉलवर्ट यांनी उपयोगी खेळ्या केल्या. मात्र, पहिलाच सामना खेळत असलेल्या सोलापूरच्या किरण नवगिरेने ३४ चेंडूवर ६९ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु, ती संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. परिणामी, संघाला १७ धावांनी पराभूत व्हावे लागले. पराभूत झाले तरी, सरस रनरेटने वेलोसिटी संघाने अंतिम फेरीत प्रवेश नक्की केला.
महत्वाच्या बातम्या-
मानलं गड्या! चक्क लग्न पुढे ढकलून रजत पोहोचलाय आयपीएल खेळायला