इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात डिसेंबर महिन्याच्या ८ तारखेपासून पासून ऍशेस मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात ऍलेक्स केरीला यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात सामील केले गेले. संघाचा नियमित कसोटी कर्णधार टिम पेनने कर्णधारपद सोडत काही काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. पेनने त्याच्या एका माजी सहकारी कर्मचारीसोबत अश्लील चर्चा केला होती. ही गोष्ट माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांच्या मते केरीला मिळालेल्या या संधीमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले पाहिजे.
जेसन गिलेस्पी सध्या दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहे आणि केरी देखील याच ठिकाणाहून येतो. याच कारणास्तर जेसन केरीला चांगल्या प्रकारे ओळखतात. ते म्हणाले की, केरीने ऑस्ट्रेलिया संंघात स्थान बनवण्यासाठी स्वतःला सिद्ध केले आहे. तत्पूर्वी, दक्षिण ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळताना रविवारी मार्श चषक स्पर्धेत केरीने क्वींसलंड संघाविरुद्ध शतकी खेळी केली. याच पार्श्वभूमीवर जेसन म्हणाले की, त्याने यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात ऑस्ट्रेलिया संघात स्वतःचे स्थान बनवले पाहिजे.
जेसन ऑस्ट्रेलियाच्या एका रेडिओ स्टेशनवर बोलताना म्हणाले की, “मी ऑस्ट्रेलियाच्या निवडकर्त्यांशी बोलू नाही शकत. मला नाही माहीत की, त्यांचे काय निकष आहेत. मात्र, केरीने स्वतःला सिद्ध केले आहे. त्याला जगभरात क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळाला आहे. सोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले होते. त्याने खेळाच्या इतर प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. तो काही काळासाठी ऑस्ट्रेलिया संघातही राहिला आहे. जो ऍशेसमध्ये विरोधी संघासमोर उतरणार आहे.”
केरीविषयी बोलताना जेसनने त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ऍडम गिलख्रिस्टसोबत केली. ते म्हणाले की, “गिलीला पहिल्यांदा कसोटी संघात २९ वर्षाचा असताना निवडले गेले होते. मात्र, तो अनेक वर्षांपासून एकदिवसीय संघात सामील होता. तसेच ऍलेक्स केरी जो ३० वर्षाचा आहे, यांच्यामध्ये खूप काही साम्य आहे. तो देखील त्याच्या कारकिर्दीच्या त्याच टप्प्यावर उभा आहे, असे मला वाटते. त्याला संघात सामील केले पाहिजे, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जर त्याला संधी दिली गेली तर, तो चांगले प्रदर्शन करेल.”