भारतीय महिला क्रिकेट संघातील महान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट काराकिर्दीच्या सन्मानार्थ तिचा फोटो असलेले टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तिचा फोटो असलेल्या या टपाल तिकीटाचे अनावरण कोलकातामधील क्रिडा पत्रकार क्लबच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही उपस्थित होता.
या टपाल तिकीटाचा फोटो गोस्वामीने तिच्या इंस्टाग्राम अकांउटवरुन शेयर केला आहे.
https://www.instagram.com/p/Bh0OLWBFED3/?hl=en&taken-by=jhulangoswami
गोस्वामी नुकतीच वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. तसेच ती मागच्याच वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज बनली होती.
यासाठी तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅथ्रीन फिट्झपॅटिकला मागे टाकले होते. ही कामगिरी तिने मागच्याच वर्षी मे महिन्यात दक्षिण अफ्रिकेत झालेल्या चौरंगी मालिकेत केली होती.
गोस्वामीने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 169 सामन्यात 21.77 च्या सरासरीने 203 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 10 कसोटी सामन्यात 40 विकेट्स घेतल्या आहेत. या बरोबरच 64 टी 20 सामन्यात तिच्या नावावर 55 विकेट्स आहेत.