कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी हॅट्रिक घेणे हे एक प्रकारचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४९ हॅट्रिक घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये एक खेळाडू असा आहे, ज्याने एकाच कसोटीत दोन हॅट्रिक मिळवल्या. विशेष म्हणजे या दोन्ही हॅट्रिक एकाच दिवसात घेतल्या गेलेल्या. अशी अचाट कामगिरी करणारा हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचे महान लेगस्पिनर जिमी मॅथ्यूज होय. त्यांनी हा कारनामा १९०२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. या विक्रमाची आठवण येण्याचे कारण म्हणजे हा विक्रम आजच्या दिवशी म्हणजे २८ मे रोजी झालेला.
मॅथ्यूज अशी कामगिरी करणारे क्रिकेट विश्वातील एकमेव गोलंदाज आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी या दोन्हीही हॅट्रिकदरम्यान क्षेत्ररक्षकांची मदत घेतली नाही व सर्व फलंदाजांना पायचीत, कॉट अँड बोल्ड म्हणजेच स्वत:च्याच चेंडूवर झेल अथवा त्रिफळाचीत केले.
दिवसातील पहिली हॅट्रिक
सन १९१२ मध्ये इंग्लंडच्या धरतीवर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान तिरंगी मालिका आयोजित केली होती. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावरील मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४४८ धावा बनविल्या. वॉरन बर्डस्ले व चार्ल केलवे यांनी शतके झळकावली.
प्रत्युत्तरादाखल बिल व्हिट्टीने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५ बळी घेत गुंडाळला. सामन्याच्या दुसर्या दिवशी आफ्रिकेच्या संघाने ७ गडी राखून २६५ धावा केल्या होत्या तेव्हा मॅथ्यूज यांनी इतिहास रचण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. जिमी मॅथ्यूज यांनी प्रथम रोलँड ब्यूमॉन्टला त्रिफळाचीत केले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर त्यांनी सिड पेगलर आणि यष्टीरक्षक टॉमी वार्डला पायचित करून दिवसातील पहिली हॅट्रिक पूर्ण केली.
दुसरी हॅट्रिक
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिला व दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव पुन्हा सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात देखील संघर्ष करताना दिसून आला. त्यांचे ६ फलंदाज ७० धावांमध्ये बाद झालेले. मॅथ्यूज यांनी प्रथम हर्बी टेलर यांना बाद केले. यानंतर रेगे श्वार्झ आणि टॉमी वार्ड यांना तंबूत पाठवून मॅथ्यूज यांनी दुसरी हॅट्रिक संपादन केली. ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव ८८ धावांनी जिंकत विजयी सुरुवात केली.
छोटी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जिमी मॅथ्यूज यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत छोटी राहिली. आठ सामन्यांत ते १६ फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्यांना इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला होता. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी विल्यमटाऊन येथे ग्राउंड्मन म्हणून काम पाहिले. टीबीच्या आजाराने ग्रस्त मॅथ्यूज यांनी ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
जल्लोष तर होणारच! १४ वर्षांनी आयपीएल फायनलला पोहचलेल्या राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन
IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश