ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठित ऍशेस मालिका (Ashes Series) सुरू आहे. या मालिकेत आतापर्यंत इंग्लंड संघाला साजेशे प्रदर्शन करता आलेले नाही. ऍशेस मालिकेतील सलग २ सामने गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ मेलबर्न येथे तिसरा कसोटी सामना खेळतो आहे. या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्यातही इंग्लंडला खास फलंदाजी करता आली नाही आणि त्यांचा पहिला डाव १८५ धावांवरच संपला. मात्र या डावात इंग्लंडकडून अर्धशतक झळकावत कर्णधार जो रूट (Captain Joe Root) याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
रूटसाठी २०२१ चे वर्ष अतिशय शानदार राहिले आहे. या वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रूटने आता कर्णधार म्हणूनही सर्वाधिक धावांचा टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत त्याने ८२ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. यासह त्याने कर्णधार म्हणून एका कँलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी स्वरुपात कर्णधार म्हणून १६८० धावा केल्या आहेत.
याबाबतीत त्याने ग्रॅमी स्मिथ, रिकी पाँटिंग अशा दिग्गज कर्णधारांना मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकाचे माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ १६५६ धावांसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांनी २००८ मध्ये या धावा केल्या होत्या. तर मिचेल क्लार्क, रिकी पाँटिंगआणि बॉब सिम्पसन यांसारखे दिग्गज ऑस्ट्रेलियन कर्णधारही या यादीत पहिल्या ५ जणांमध्ये आहेत.
कसोटीत एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा (Most Runs In Calender Year As Captain)
१६८० – जो रूट, २०२१(आतापर्यंत)*
१६५६ – ग्रॅमी स्मिथ, २००८
१५९५ – मायकेल क्लार्क, २०१२
१५४४ – रिकी पाँटिंग, २००५
१३८१ – बॉब सिम्पसन, १९६४
याव्यतिरिक्त रूट हा एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला कर्णधार बनला आहे. वनडे स्वरुपात भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वलस्थानी आहे. त्याने २०१७ मध्ये १४६० धावा करत हे स्थान मिळवले होते. तर टी२० स्वरुपात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम प्रथमस्थानी आहे. त्याने याचवर्षी ९३१ टी२० धावा कुटत पहिल्या स्थानी उडी घेतली आहे. तर या तिन्ही कर्णधारांना मागे सोडत, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी २००५ मध्ये तिन्ही स्वरुपात मिळून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्यांनी २८३३ धावा जमवल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स
पहिले कसोटी शतक, पहिला विजय अन् बरचं काही; द. आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत द्रविडच्या खूप आठवणी
हेही पाहा-