इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जो रुटनं शतक झळकावलं. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 241 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. रुटचं हे 32 वं कसोटी शतक होतं. या शतकानंतर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं यावर आपलं मत व्यक्त केलंय.
वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून रुटनं वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकलं. याआधी रुट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 9वा फलंदाज होता. आता शतकानंतर तो शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकत या यादीत 8व्या क्रमांकावर आला आहे. रुटनं कसोटीमध्ये 11,940 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीद तो संयुक्तपणे 11व्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकं ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं आपल्या कसोटी कारकिर्दीत 15921 धावा केल्या आणि एकूण 51 शतकं झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक पार करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
जो रुटच्या या कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानं ‘टेलिग्राफ’साठीच्या आपल्या स्तंभात लिहिलं, “जो रुट काही महिन्यांतच इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. शेवटी तो सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. त्याच्या फलंदाजीत आता पूर्वीसारखा बेजबाबदारपणा पाहायला मिळत नाही. तो वेगानं धावा करतोय, मात्र त्यामुळे त्याचा अहंकार बळावत आहे असं मला वाटत नाही. तो अत्यंत समजूतदारपणे खेळतोय. मला आवडलं की, त्यानं शतक साजरं करेपर्यंत रिव्हर्स स्कूप शॉट खेळला नाही. तोपर्यंत इंग्लंडनं बरीच आघाडी मिळवली होती.”
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीसोबतच्या नात्यावर गौतम गंभीरची स्फोटक प्रतिक्रिया; म्हणाला, “हे टीआरपीसाठी…”
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”
‘विराट-रोहित पुढचा वर्ल्डकप खेळतील का?’, कोच गंभीर म्हणाला; जर….