भारतीय संघ तब्बल 19 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे कसोटी सामना खेळणार आहे. दोन्ही देशांमधील शेवटचा कसोटी सामना 2002 मध्ये याच मैदानावर खेळला गेला होता, ज्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत यजमानांवर 151 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
लॉर्ड्स येथे पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाही भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटत नव्हते. पण शमी-बुमराहच्या भागीदारीने भारताला अडचणीतून बाहेर काढले आणि संघाने विजय साजरा केला होता. मात्र इंग्लंडकडून एकट्या जो रूटने लॉर्ड्सवर भारतीय संघाची पाळंमुळं हलवली होती. या सामन्यात जो रूटने इंग्लंडसाठी नाबाद 180 धावा केल्या होत्या. तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडसाठी ही जमेची बाजू आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत निःसंशयपणे 1-0 ने आघाडीवर आहे. पण गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यजमान संघाचा कर्णधार जो रूट हा भारतीय संघासाठी सर्वात कठीण फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे आणि असेच काहीसे हेडिंग्ले येथेही घडू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जो रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यामुळे तो भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका आहे. याव्यतिरिक्त, हेडिंग्ले हे त्याचे होम ग्राउंड अर्थातच घरचे मैदान आहे आणि त्याला याचा भरपूर फायदा मिळू शकतो. त्यामुळे भारतीय संघाने हेडिंग्ले कसोटी जिंकण्यासाठी जो रूटबद्दल विशेष रणनीती आखणे आवश्यक आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट या कसोटी मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या चार डावांमध्ये 64, 109, 180* आणि 33 धावा केल्या आहेत. चार डावांमधील दोन शतके हे स्पष्टपणे दाखवतात की, तो किती चांगल्या दर्जाची फलंदाजी करत आहे. त्यातही घरचे मैदान म्हटल्यावर तो शतकाचे सहज द्विशतकात रुपातंर करू शकतो. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडच्या कर्णधाराला कमी धावांवर रोखण्यासाठी कशी शक्कल लढवतो? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेच्या धरतीवर पहिले अर्धशतक! उन्मुक्त चंदने शेअर केला ताबडतोड फलंदाजीचा व्हिडिओ