इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. तिसऱ्या सत्राखेर त्याने ५० हून अधिक धावा केल्या असून खास विक्रम नोंदवला आहे.
या ३० वर्षीय फलंदाजाने २०१२ साली भारताच्या भूमीत भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतात एकूण ६ सामने खेळले होते. चेन्नई येथे चालू असलेला सामना हा भारताच्या मैदानावरील त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवा आहे. या समन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११० चेंडूत नाबाद राहत अर्धशतक पूर्ण केले. यासह रूट भारतातील सलग ७ कसोटी सामन्यात अर्धशतकाहून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
रूटने आजवर भारताच्या मैदानांवर भारताविरुद्ध केवळ ७ कसोटी सामने खेळले आहेत. यातील प्रत्येक सामन्यात अर्धशतक करताना त्याने एकूण ६५२ धावा केल्या आहेत.
जो रूटची भारतातील कसोटी सामन्यातील कमागिरी
नागपुर – ७३ आणि नाबाद २० धावा
राजकोट- १२४ आणि ४ धावा
विजाग- ५३ आणि २५ धावा
मोहाली- १५ आणि ७८ धावा
मुंबई- २१ आणि ७७ धावा
चेन्नई- ८८ आणि ६ धावा
चेन्नई- नाबाद ५१ धावा
याबरोबरच भारताच्या मैदानांवर सलग ७ कसोटी सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमात त्याने व्हिव्हिएस लक्ष्मण आणि अल्विन कालिचरण या दिग्गजांची बरोबरी केली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण यांनी २००९-१० या कालावधीत घरच्या मैदानावरील सलग ७ कसोटी सामन्यात एकदा तरी धावांची पन्नाशी पार केली होती. तसेच वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू कालिचरण यांनीही १९७४-७९ दरम्यान हा पराक्रम केला होता.
पाकिस्तानी दिग्गज जावेद मिंयादाद या विक्रमात अव्वलस्थानी विराजमान आहेत. १९८०-८७ दरम्यान भारतात भारताविरुद्ध सलग कसोटी सामन्यात त्यांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: ‘अशी’ मिळवली बुमराहचे घरच्या मैदानावरील पहिली कसोटी विकेट, पाहून फलंदाजही अवाक्
इमरजन्सीमध्ये टीम इंडियाला येते शाहबाज नदीमची आठवण, घेतल्यात ७०० हून जास्त विकेट्स