ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर ८ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ऍशेस मालिका (ashes series) सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर या मालिकेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचा बोलबाला होता, तर तिसऱ्या दिवशी (१० डिसेंबर) इंग्लंड संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. इंग्लंड संघाकडून दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार जो रूटच्या ( joe root) च्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १४७ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूट खातेही न उघडता माघारी परतला होता. परिणामी इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या डावात जो रूटने अप्रतिम खेळी करत इंग्लंड संघाला जोरदार पुनरागमन करून दिले आहे. तो तिसऱ्या दिवशी नाबाद ८६ धावांवर माघारी परतला. त्याने डेविड मलान सोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली.
दरम्यान ८० धावांची खेळी करताच तो एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ७ वा फलंदाज ठरला आहे. या यादीत अनेक दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.
जो रूटने २०२१ मध्ये १३ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ६७ च्या सरासरीने १५४१ धावा केल्या आहेत. या यादीत त्याने दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगला देखील मागे टाकले आहे. तसेच एका वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्तान संघाचा मोहम्मद युसुफ सर्वोच्च स्थानी आहे. त्याने २००६ साली १७८८ धावा केल्या होत्या.
एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१७८८ धावा – मोहम्मद युसूफ ,२००६
१७१० धावा – व्हिव्ह रिचर्ड्स, १९७६
१६६५ धावा – ग्रॅमी स्मिथ,२००८
१५९५ धावा – मायकल क्लार्क, २०१२
१५६२ धावा- सचिन तेंडुलकर, २०१०
१५५५ धावा – सुनील गावस्कर, १९७९
१५४४ धावा – रिकी पाँटिंग २००५
१५४१ धावा – जो रूट, २०२१*
१५०३ धावा – रिकी पाँटिंग २००३
तसेच जो रूट इंग्लंड संघासाठी एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने या याबाबतीत मायकल वॉन यांना देखील मागे टाकले आहे. मायकल वॉन यांनी २००२ मध्ये १४८१ धावा केल्या होत्या, तर जो रूटने आतापर्यंत १५४१ धावा केल्या आहेत.
एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५७१ धावा – जो रूट (२०२१)*
१४८१ धावा – मायकल वॉन (२००२)
१४७७ धावा – जो रूट (२०१६)
१४७० धावा – जॉनी बेअरस्टो (२०१६)
१३८५ धावा – जो रूट (२०१५)
महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! माजी क्रिकेटर विनोद कांबळी झाला सायबर फ्रॉडचा बळी, चोरांकडून लाखोंची फसवणूक
युझवेंद्र चहलच्या पत्नीने केली धोनीच्या ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
इंग्लडच्या चिंतेत वाढ!! पहिल्याच ऍशेस सामन्यात ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त