इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या ३० वर्षीय फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत सलग ३ शतके झळकावली आहेत. त्याच्या याच कामगिरीचा फायदा त्याला आयसीसीच्या नव्याने जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत झाला आहे. त्याने न्यूझीलंडचा विश्वविजेता कर्णधार केन विलियम्सन याला पछाडत अव्वलस्थानी ताबा मिळवला आहे.
जो रूट ठरला अव्वल
बुधवारी (१ सप्टेंबर) आयसीसीने कसोटीची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत रूट अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. भारताविरुद्ध नॉटिंघम, लॉर्ड्स आणि लीड्स येथे झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यात त्याने सलग ३ शतके ठोकली आहेत. या शतकांसह त्याने १२६.७५ च्या सरासरीने ५०७ धावा चोपल्या आहेत. यासह त्याने विलियम्सनला मागे टाकत तब्बल ६ वर्षांनंतर पुन्हा प्रथमस्थानी झेप घेतली आहे. तो ९१६ गुणांसह या स्थानावर आहे. तर विलियम्सन ९०१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
रूटव्यतिरिक्त त्याचे संघ सहकारी जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान यांनाही फायदा झाला आहे. बेयरस्टो ५ स्थानांनी उडी घेत २४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर मलान ८८ व्या स्थानावर आला आहे.
रोहित शर्मा टॉप-५ मध्ये
केवळ इंग्लंडचेच फलंदाज नव्हे तर, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा यालाही मोठा लाभ झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या लीड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १९ आणि ५९ धावांची खेळी केली होती. यासह तो कर्णधार विराट कोहलीवर वरचढ ठरला आहे. ७७३ गुणांची कमाई करत त्याने टॉप-५ मध्ये जागा मिळवली आहे. दुसरीकडे कोहली ७६६ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. शिवाय हेडिंग्ले कसोटीत ९१ धावांची चिवट खेळी खेळणारा चेतेश्वर पुजाराही ३ गुणांनी प्रगती करत १५ व्या स्थानावर आला आहे.
Other changes in the @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings for the week:
🔹 Rohit Sharma overtakes Virat Kohli
🔹 James Anderson enters top fiveDetails 👉 https://t.co/woGyneJVGk pic.twitter.com/9mFl314BS8
— ICC (@ICC) September 1, 2021
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनाही फायदा
हेडिंग्ले कसोटीतील दमदार प्रदर्शनानंतरही इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना जास्त फायदा झालेला नाही. जेम्स अँडरसन मात्र एका स्थानाने भरारी घेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सामनावीर ऑली रॉबिन्सन आणि क्रेग ओव्हरटन यांनाही लाभ झाला आहे. रॉबिन्सन ९ स्थानांची प्रगती करत ३६ व्या स्थानावर आला आहे. त्याने हेडिंग्ले कसोटीत एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या. तर ६ विकेट्स घेणारा ओव्हरटन ७३ व्या स्थानावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा ‘हा’ क्रिकेटर सोडणार देश, भारतीय खेळाडूंसोबत खेळणार क्रिकेट
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार