भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी खास होता. बेअरस्टो इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळणारा 17वा खेळाडू बनला आहे.
34 वर्षीय बेअरस्टोचा इथपर्यंतचा प्रवास फार संघर्षमय होता. याचा उल्लेख त्यानं त्याचं आत्मचरित्र ‘अ क्लियर ब्लू स्काय’मध्ये केला आहे. जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड हे स्वतः कसोटी क्रिकेटपटू होते. मात्र 1998 मध्ये त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केली. असं असूनही त्यांनी जॉनीला कधीही क्रीडा क्षेत्रात जाण्यापासून रोखलं नाही. जॉनी बेअरस्टोला क्रिकेटमध्ये यश मिळवण्यापूर्वी नैराश्य आणि धक्क्यांचा सामना करावा लागला होता.
जॉनी बेअरस्टोवर त्याची आई जेनेटचा खूप प्रभाव आहे. कॅन्सरनं त्रस्त असूनही तिनं कधीच आपल्या मुलाला सरावात कमी पडू दिलं नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आईवर कर्करोगाचा उपचार सुरू असताना जॉनी सरावासाठी कारनं खूप लांब पल्ला गाठायचा. त्याच्या आईला दोनदा कॅन्सर झाला होता. मात्र तिनं आपलं आयुष्य आपल्या मुलांसाठी समर्पित केलं. आज जेव्हा जॉनी बेअरस्टो 100 वा कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याचं कुटुंब तेथे उपस्थित होतं. सामन्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघानं त्याचा गौरव केला. यावेळी बेअरस्टो भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही बेअरस्टोची इंग्लंड कसोटी संघात निश्चित भूमिका कधीच नव्हती. त्याचा फलंदाजीचा क्रम सतत बदलत राहिला. बेअरस्टो फलंदाजीसह विकेटकीपिंगही करतो. मात्र तो कधीच संघाचा मुख्य विकेटकीपर राहिला नाही. एवढी अनिश्चितता असूनही तो सतत मेहनत करत राहिला. याचं फळ आज त्याला मिळालं आहे.
मुख्य प्रशिक्षक ब्रॅन्डन मॅक्युल्लम याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघानं टेस्टमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजांच्या या शैलीला ‘बेझबॉल’ असं नाव देण्यात आलंय. जॉनी बेअरस्टो हा ‘बेझबॉल’ शैलीचा पोस्टर बॉय मानला जातो. 2022 पासून त्यानं निर्भयपणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे हे गुण दाखवतात की तो एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघासाठी काहीही करायला तयार आहे. यामुळेच तो सध्याच्या इंग्लंड संघातील एक महत्त्वाचा सदस्य बनलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: शुभमन नव्हे, हा तर ‘सुपरमॅन’! चित्त्यासारखं मागे धावत जाऊन घेतला बेन डकेटचा शानदार झेल
IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा, अश्विनच्या 100 व्या कसोटीत इंग्लंड झाले गार
धरमशाला कसोटीत युवा फलंदाजाचं पदार्पण, 24 वर्ष जुना विक्रम मोडला