मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज आणि क्षेत्ररक्षणातील जगप्रसिद्ध खेळाडू जॉन्टी रोड्सची, स्वीडन क्रिकेट असोसिएशनने, राष्ट्रीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये रोड्स ही जबाबदारी स्वीकारतील. रोड्स सध्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे, त्यामुळे ते आयपीएलनंतर ही नवीन जबाबदारी स्वीकारतील.
रोड्सने आपल्या या नव्या भूमिकेविषयी सांगितले की, हा देश आपल्या क्रिकेटसाठी प्रसिद्ध नाही, म्हणून या नव्या आव्हानासाठी मी तयार आहे. तो म्हणाला, “माझ्या कुटुंबासमवेत स्वीडनला जाऊन स्वीडन क्रिकेट समुदायाबरोबर काम करायला मिळत असल्याने मला आनंद झाला आहे. ही संधी योग्य वेळेत मिळाली आहे. मला माझे काम लवकरात लवकर सुरू करायचे आहे. मी स्वीडिश क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. मी नवीन वातावरणात माझ्या पूर्ण क्षमतेसह ही नवी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन.”
स्वीडनमध्ये गेल्या 2 वर्षात क्रिकेट खेळणार्या लोकांच्या संख्येत 300 टक्के वाढ झाली आहे. क्रिकेट हा स्वीडनमधील वेगवान वाढणारा दुसरा खेळ आहे. पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या बाबतीत स्वीडिश क्रिकेट मजबूत आहे. अशा परिस्थितीत, स्वीडिश क्रिकेट असोसिएशन तेथील सर्व क्रिकेट संघटनांसह त्यांचे कार्य वाढविण्यासाठी आणि संधी निर्माण करण्यासाठी कार्य करीत आहे. जास्तीत जास्त मुले, तरूण, पुरुष, स्त्रिया आणि मुली जोडणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे.
रोड्स आपल्या कारकीर्दीत आफ्रिका संघाकडून 52 कसोटी कारकीर्द, 245 वनडे सामने खेळला आहे. त्याने दोन्हीं प्रकारात मिळून एकूण 8, हजार 467 धावा केल्या. आजही त्याचे नाव क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गणले जाते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक स्टाफमध्येही रोड्सचा सहभाग होता.
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाबरोबर काम करण्यापूर्वी तो बरीच वर्षे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सशी जोडलेला होता. 2003 मध्ये, तो दुखापतग्रस्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 1992 ते 2003 या काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता.






