संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) अ गटातील श्रीलंका आणि इंग्लंड संघ आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर २६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. इंग्लंडच्या या विजयाचा नायक उपकर्णधार जोस बटलर ठरला. त्याने तुफानी नाबाद शतक झळकावत सलग तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला. या शतकासह त्याने अनेक नवे विक्रम आपल्या नावे जमा केले.
बटलरचे पहिले टी२० शतक
मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८० धावांची खेळी करत बटलरने इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. त्याच सामन्यातील फॉर्म कायम राखत त्याने श्रीलंकेविरुद्ध ६७ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची नाबाद खेळी केली. या शतकासह तो इंग्लंडसाठी टी२० विश्वचषकात शतक ठोकणारा केवळ दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला. यापूर्वी २०१६ टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध ऍलेक्स हेल्सने शतक ठोकले होते.
अशी कामगिरी करणारा पहिला इंग्लिश फलंदाज
बटलरने आपल्या आक्रमक शतकासह इंग्लंडसाठी वनडे, कसोटी व टी२० अशा तिनही प्रकारात शतक झळकावणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. तसेच तो २०२१ टी२० विश्वचषकात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. तो टी२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा केवळ आठवा फलंदाज आहे.
इंग्लंडचा सलग तिसरा विजय
शारजा येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. जोस बटलरचे शानदार शतक व ओएन मॉर्गनच्या ४० धावांच्या जोरावर इंग्लंडने १६३ धावा काढल्या. श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगाने सर्वधिक तीन बळी मिळवले. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचे फलंदाज बेजबाबदार फटके मारत बाद झाले. मोईन अली, आदिल रशीद व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत श्रीलंकेचा डाव १९ षटकात १३७ धावांवर गुंडाळला.
महत्त्वाच्या बातम्या-
कठीण काळात पीटरसन उभा राहिला टीम इंडियाच्या पाठीशी; हिंदीत ट्विट करत म्हणाला…
‘सुपरमॅन’ नीशम! बाऊंड्री लाईनजवळ हवेत उडी मारत अडवला हार्दिक पंड्याचा षटकार, पाहा व्हिडिओ
‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘हिटमॅन’ जोरदार ट्रोल